हरयाणात बहुरंगी लढत !

काँग्रेसने आपशी जागावाटपाची केलेली बोलणी फिसकटल्याने आता हरयाणात भाजप, काँग्रेस, जननायक जनता पक्ष, आप असे पक्ष रिंगणात आहेत. १० जागा काँग्रेसने आपला सोडाव्यात ही मागणी काँग्रेस नेत्यांनी अमान्य करून पाच जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता.

Story: संपादकीय |
11th September 2024, 08:24 pm
हरयाणात बहुरंगी लढत !

जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन प्रदेशांतील विधानसभेच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असतानाच, तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची घाई चालली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होणाऱ्या मतदानातून नेमका काय संदेश दिला जातो, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर असते, त्याच पक्षाचे सरकार हरयाणात सत्ता सांभाळते, हा इतिहास यावेळी बदलला जातो का, याबद्दल वेगळेवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. हरयाणा राज्याच्या निर्मितीनंतर म्हणजे गेल्या ५८ वर्षांतील ३३ वर्षे या राज्यात जाट समाजाचे मुख्यमंत्री निवडले गेले होते. मात्र २०१४ साली भाजपने जाट सोडून इतर समाजांना एकत्रित आणून बिगरजाट मुख्यमंत्री निवडला. भाजपने इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातींच्या मतदारांना आपल्याकडे वळवून सत्ता प्राप्त केली होती. ती अद्याप राज्यात टिकून आहे. यापुढे म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानात भाजप आपली सत्ता टिकवू शकेल का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वच्या सर्व म्हणजे दहा जागांवर विजय प्राप्त झाला होता, पण २०२४ मध्ये भाजपला केवळ पाच आणि काँग्रेसला पाच अशी विभागणी झाल्याचे दिसून आले. या कारणामुळे काँग्रेसचा उत्साह वाढणे साहजिक होते. आता राज्यातही सत्ता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट त्या पक्षाने निश्चित केले आहे. यासाठी इंडी आघाडीतील आम आदमी पक्षाला सोबत घेण्याचे ठरवले होते.

काँग्रेसने आम आदमी पक्षाशी जागावाटपाची बोलणी केली ती यशस्वी न झाल्याने आता हरयाणात भाजप, काँग्रेस, जननायक जनता पक्ष, आप असे पक्ष रिंगणात उतरले आहेत. ९० पैकी किमान १० जागा काँग्रेसने आम आदमी पक्षाला सोडाव्यात ही मागणी काँग्रेस नेत्यांनी अमान्य केली. हव्या असतील तर पाच जागा देऊ असा प्रस्ताव दिला होता. तो अमान्य करून आता आप स्वतंत्रपणे सर्व जागा लढविण्याची तयारी करीत आहे. अर्थात या पक्षाचे हरयाणातील स्थान नगण्य असल्याचे मागच्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे. 

गोव्याप्रमाणे नाममात्र असलेल्या आम आदमी पक्षाची कुवत काँग्रेसने ओळखली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा यांनी आम आदमी पक्षाला नेहमीच दूर ठेवले, तरीही राहुल गांधी यांच्या आग्रहास्तव चर्चा झाली जी निष्फळ ठरली आहे. दिल्लीतील एका काँग्रेस नेत्याने मोडता घातल्याचा आरोप आपने केला आहे. काही का असेना, आता भाजप आणि काँग्रेस अशी लढत न होता स्थानिक पक्षही रिंगणात असल्याने बहुरंगी लढत अपेक्षित आहे. भाजपची लोकसभा निवडणुकीतील २०१९ मधील ५८ टक्के मते २०२४ मध्ये ४६ टक्क्यांवर आल्याने विरोधकांमधील उत्साह वाढला असला तरी निवडणुका एकतर्फी होणार नाहीत. २०१९ मध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेला दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाने आता फारकत घेतली आहे, त्यांचा पक्ष, अभय चौताला यांचा इंडियन नॅशनल लोकदल, चंद्रशेखर आझाद यांची समाज पार्टी (काशीराम) अशा पक्षांनी दलित मते मिळवण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या पक्षांनी दहा-बारा जागांवर विजय मिळवला तर ते किंगमेकर ठरू शकतात. 

सध्या तरी भाजप आणि काँग्रेस पक्ष बहुमताची खात्री व्यक्त करीत आहेत. या पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्यास चौतालांचे पक्ष कोणत्या पक्षाकडे धाव घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. भाजपला त्या राज्यात हिंदुत्वाची किती मदत होते, तेही पाहावे लागेल. अयोध्येतील श्रीराम मंदिरानंतर त्या राज्यातही हिंदुत्ववाद्यांची संख्या वाढली आहे, असे दिसून येते. बेरोजगारी, जाटांना ओबीसाचा दर्जा न मिळणे, शेतकऱ्यांचे आंदोलन असे मुद्दे भाजपला मारक ठरू शकतात. याचा लाभ काँग्रेस किती घेते ते पाहावे लागेल. राज्यातील ३० टक्के जाट मते कोणाकडे वळतात, तेही महत्त्वाचे ठरणार आहे.

आतापर्यंतचे हरयाणामधील वातावरण पाहिले तर सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीने त्रस्त केल्याचे दिसते आहे. अनेकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर त्या नेत्यांनी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारल्याचे दिसते आहे. महत्त्वाच्या नेत्यांची पक्षांतरे त्या-त्या पक्षाला हानिकारक ठरू शकतात. भाजपने निम्मे चेहरे नवे दिल्याने प्रस्थापित नेत्यांना हादरा बसला आहे. काँग्रेसमध्येही वेगळी अवस्था नाही. आम्ही बंडखोरी संपुष्टात आणू, त्याचा परिणाम पक्षावर होणार नसल्याचा दावा नेते करीत असले तरी यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता बंडखोर अन्य पक्षात जाऊन किंवा अपक्ष म्हणून लढून बाजी मारू शकतात. याचा सारा निवाडा ८ ऑक्टोबर रोजी होणार असल्याने जम्मू-काश्मीर व हरयाणात सत्ता कोणाकडे याचे चित्र त्या दिवशी स्पष्ट होईल.