बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. अद्याप हसीना यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, हसीना यांना किती वेळ आश्रय द्यायचा हे भारताला जलदगतीने ठरवावे लागणार आहे.
१९५९ मध्ये तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना भारताने राजकीय आश्रय दिला. तिबेटवर चीनने आक्रमण केल्यामुळे लामा यांनी थेट भारत गाठले. भारताने त्यांना दिलेल्या आश्रयाने चीनचा तीळपापड झाला. अखेर १९६२ मध्ये युद्धाच्या रूपात चीनने हिशोब चुकता केला. दलाई लामांना दिलेल्या राजकीय आश्रयाची भारताला जबरदस्त किंमत मोजावी लागली. हा इतिहास असल्याने त्यातून धडा घेणे आणि हसीनांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणे भारताला क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात भारताच्या काही हालचाली सुरू आहेत. मात्र, त्यास अंतिम रूप देणेही गरजेचे आहे.
हसीना या भारत सरकारसाठी जणू संकटच बनल्या आहेत. अद्यापही हसीना यांना कुठल्याही देशाने राजाश्रय देण्याची तयारी दाखविलेली नाही. अमेरिका, ब्रिटन यांनी तर स्पष्ट नकार दिल्याचे सांगितले जात आहे. हसीनांसाठी भारत काही देशांकडे वकिली करीत आहे. त्यास अद्याप यश आलेले नाही. बांगलादेशसारख्या मुस्लिम देशाचे नेतृत्व करणाऱ्या हसीना यांना एकाही मुस्लिम देशाने आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. किंबहुना हसीना यांनीही अटीतटीच्या प्रसंगात एकाही मुस्लिम देशाऐवजी धर्मनिरपेक्ष असलेल्या भारताची निवड केली. यातून अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार जगाच्या पाठीवर एकूण ४३ मुस्लिम देश आहेत. मात्र, हसीना यांना आश्रय देण्यासाठी हे देश अनुकूल नाहीत. त्यामुळे त्यांना आश्रय मिळवून देण्यासाठी भारत आपल्याच दोस्त राष्ट्रांना गळ घालत आहे. याकामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
हसीना यांचे भारतात अधिक काळ राहणे हे भारतासाठीच अडचणीचे आहे. कारण त्या भारतात असल्याने बांगलादेशसोबतचे संबंध उत्तम राहणे अवघड आहे. गेली १५ वर्षे हसीना यांची एकहाती सत्ता बांगलादेशात होती. त्यांना भारत जवळचा मित्र देश वाटत होता. त्यामुळेच त्यांनी भारतासोबत व्यापारासह आदानप्रदान आणि विविध बाबींना प्राधान्य दिले. परिणामी दोन्ही देशांमध्ये अब्जावधी रुपयांचा व्यापार होतो आहे. हसीना यांच्यावर असलेला रोष आणि त्यांना भारताची असलेली साथ यामुळे सर्वसामान्य बांगलादेशी युवक आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, नजीकच्या काळात बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या आणि बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख खालिदा झिया या सत्तेत आल्या तर भारतासाठी ती बाब कठीण असेल. कारण खलिदा झिया यांनी कधीही भारताला आपले मित्र मानलेले नाही. शिवाय हसीना पंतप्रधान असताना त्यांनी झिया यांना नजरकैदेत ठेवले होते आणि त्यांच्या पक्षावर बंदी आणली. हंगामी सरकार स्थापन होताच झिया यांना मुक्त करण्यात आले आहे. आता त्या देशभरात आपल्या पक्षाचे जाळे मजबूत करून सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतील. हसीना यांच्याविषयी जनतेत असलेला रोष आणि त्या बांगलादेशातील त्यांची अनुपस्थिती या दोन्हींचा फायदा झिया यांना होण्याची चिन्हे आहेत. झिया यांना नेहमीच पाकिस्तान व चीन ही राष्ट्रे जवळची वाटली आहेत. हे दोन्हीही भारताचे शत्रू आहेत. शिवाय सत्तेत आल्यावर आपले हिशोब चुकते करण्यासाठी झिया यांच्याकडून हसीना यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची पावले उचलली जातील. तोपर्यंत हसीना जर भारतात राहिल्या तर ती बाब भारताला चांगलीच महागात पडू शकते.
बांगलादेशचे भौगोलिक स्थान लक्षात घेतले तर तो भारताच्या जणू बगलेत असणारा देश आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला भारतीय भूभाग आणि मधोमध बांगलादेश. या दोन्ही देशांमधील भूसीमा जवळपास ४ हजार किलोमीटरची आहे. संरक्षण आणि सामरिकदृष्ट्या बांगलादेशचा भूभाग हा भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे. सद्यस्थितीचा विचार करता भूतान आणि बांगलादेश या दोन शेजारी राष्ट्रांसोबतच भारताचे संबंध उत्तम आहेत. अन्य शेजारी पाकिस्तान, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका, मालदीव यांच्यासोबतचे संबंध फारसे चांगले नाहीत.
बांगलादेशात अस्थैर्य निर्माण होण्यात चीन आणि पाकिस्तान यांनी छुपी भूमिका बजावली आहे. हे कुटील कारस्थान यशस्वी होऊ नये म्हणून बांगलादेशात नवे सरकार स्थापन व्हावे आणि त्यांच्यासोबत आपले संबंध कायम राहावेत, यासाठी भारताला ठोस प्रयत्न करावे लागतील. ज्या देशात आजवर भारतीय पंतप्रधान गेले नाही अशा देशांना भेटी देऊन त्यांना आपले मित्र राष्ट्र करण्याचा सपाटा नरेंद्र मोदी यांनी लावला आहे. त्यामुळेच त्यांची पोलंड, युक्रेन, ब्रुस्नोई आदी देशांमधील भेटी चर्चेच्या ठरल्या आहेत. मात्र शेजाऱ्यांशी संबंध वाढविण्यावर मोदी यांनी अधिक भर द्यायला हवा, असे जाणकारांचे ठाम मत आहे. कारण, भलेही दूर असलेला युक्रेन किंवा ब्रुस्नोई आपला घनिष्ट मित्र होईल पण शेजारी राष्ट्रांमधील कटुत्वामुळे भारताला एकाचवेळी असंख्य आघाड्यांवर तोंड देणे भाग पडेल. त्यामुळे भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाची आखणी योग्य पद्धतीने करणे अगत्याचे आहे.
दरम्यान, ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला त्यास आता वर्ष लोटले आहे. अद्यापही त्या राज्यात शांतता आणि सलोखा प्रस्थापित झालेला नाही. मात्र, तेथे सध्या घडलेली एक घटना अतिशय चिंताजनक आणि आव्हानात्मक अशी आहे. बंडखोरांनी थेट ड्रोनद्वारे मणिपूरच्या काही भागात हल्ले केले आहेत. गेल्या काही वर्षांत ईशान्येमध्ये बंडखोरांची आक्रमकता जवळपास संपुष्टात आली होती. मात्र, आता त्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्याचा संबंधही बांगलादेशशी आहे. कारण, चीन आणि पाकिस्तान यांनी भारताच्या ईशान्येतील बंडखोरांना ताकद पुरविण्यासाठी बांगलादेशचा वापर केल्याचा इतिहास आहे. बांगलादेशातील अस्थैर्य आता ईशान्य भारतातील बंडखोरांची सक्रियता वाढविणारे आहे. यापूर्वी बंडखोरांनी ड्रोन हल्ल्यांसारखे आधुनिक अस्त्र वापरले नव्हते. आताच्या या हल्ल्यांची गंभीर दखल भारताला घ्यावीच लागेल. अर्थात त्याचे मूळ हसीना यांच्याशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या आश्रयाचा फैसला झाल्यावरच भारताला पुढील चाली खेळता येणार आहेत.
भावेश ब्राह्मणकर
(लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे
अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)