मडगावमधील दोन्ही मार्केटांची स्थिती चांगली नसल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्या जीवालाही धोका होण्याची शक्यता आहे. मडगावचे गांधी मार्केट व न्यू मार्केटच्या इमारतींची पूर्णतः डागडुजी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून केलेली नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मडगावात येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. देखभाल दुरुस्तीकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष होत असल्याने या बाजारपेठेतील दोन्ही मार्केटच्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत. मागील पंचवीस वर्षांत अनेक मुख्याधिकारी व नगराध्यक्ष होऊन गेले, परंतु कुणीही मडगावच्या बाजारपेठांतील समस्या दूर करणे शक्य झाले नाही. या मार्केटमध्ये पहाटेपासून माल येण्यास सुरुवात होते व कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मडगाव न्यू मार्केटची स्थिती बिकट झाली आहे. सडेकर लेनमधील एका दुकानाचे कौले घातलेले छप्पर अचानक कोसळले. असे प्रकार वर्षातून दोन ते तीन वेळा तरी घडतात. लॉरेन्स फोटो स्टुडियो जवळच्या एका जीर्ण इमारतीचे कमकुवत झालेले छप्पर कोसळून पडण्याची घटना वर्षभरात दोन वेळा घडली. मडगावच्या सडेकर लेनमधील काही दुकाने गेल्या वीस वर्षांपासून बंद असून दुकानांची व छपरांची डागडुजी न केल्याने हा भाग दरवर्षी पावसात भिजून जीर्ण होऊन कोसळत आहे. दोनवेळा हे छप्पर पहाटेच्या वेळी कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी दिवसभर शेकडो लोकांची वर्दळ असते. रात्रीच्यावेळी मडगाव शहरातील दुकाने बंद झाल्यावर सर्रास अनेक दुकानांच्या समोर मद्यपी पडलेले दिसून येतात.
मार्केटमध्ये योग्य प्रकारची शेड नाही, स्वच्छतागृहांचा अभाव आहे, पावसाच्या पाण्याला वाहण्यास चांगली गटारे नाही, कचरा साफसफाई करण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने कचर्याचे ढीग पडलेले असतात. मार्केटमध्ये टाईल्स बसवण्यात आलेले नाहीत, आग विझवण्याची सोयही नाही. शेड किंवा प्लास्टिकची ताडपत्री न घातल्यास पावसात मार्केटमध्ये पाण्याच्या धारा पडतात. मडगाव मार्केटमध्ये आग लागल्याचे प्रकार घडतात तेव्हा पालिकेला जाग येते. परंतु पालिका पाण्याची टाकी बसविण्याचे गांभीर्य नाही. पाण्याची टाकी बसविण्यासाठी केलेल्या प्रत्येक जागेसाठी पालिकेकडून काही न काही कारण दाखवून नकार दिला जातो. व पालिकेने नमूद केलेल्या जागा मार्केटमधील व्यावसायिकांना मान्य नसतात. मडगावच्या दोन्हीही मार्केटची रचना अडगळीच्या स्वरूपाची असल्याने मोठ्या आगीपासून बचाव करणे जिकिरीचे काम ठरणार आहे.
अजय लाड,
(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ आहेत.)