कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील हुमनाबाद रोडवर असलेल्या ओला इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूमला भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, शोरूमचे मोठे नुकसान झाले असून तेथे उपस्थित असलेल्या ६ दुचाकी, एक कम्प्युटर सिस्टम आणि तत्सम महत्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी ही आग लागली. या घटनेतील आरोपी नदीमला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी एका ग्राहकाने तीन दिवसांपूर्वी ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली होती, त्या बाईकमध्ये काहीतरी गडबड असल्याचे समोर आले होते. मोहम्मद नदीम नावाचा ग्राहक आपली दररोज दुचाकी शोरूममध्ये घेऊन येत होता. शोरूममधील सेल्स टीम व इतर कर्मचाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. दरम्यान मंगळवारी नदीमने आपली दुचाकी पुन्हा दुरुस्ती आणली असता शोरूममध्ये त्याचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. थोड्याच वेळात शोरूममध्ये आग लागली.
दरम्यान नदीमने स्वतः पोलिस स्थानकात जाऊन शो रूमला आग लावल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी शोरूममधून खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक ओला बाईकमध्ये काहीतरी गडबड झाल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. शोरूममधून समस्यांचे योग्य निराकरण होत नसल्यामुळे तो चांगलाच संतापला आणि काल सकाळी पेट्रोल शिंपडून शोरूमला आग लावल्याचे त्याने सांगितले.