चार महिन्यानंतरही मालपे राष्ट्रीय महामार्गावरील दरड जैसे थे

भिंत उभारताना सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे दरड कोसळली

Story: प्रतिनीधी। गोवन वार्ता |
11th September 2024, 12:13 am
चार महिन्यानंतरही मालपे राष्ट्रीय महामार्गावरील दरड जैसे थे

पेडणे : मालपे राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील दरड जून महिन्यात कोसळली, त्यानंतर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. परंतु आजपर्यंत यावर कोणतीच उपाययोजना आखली गेली नाही तसेच कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी अभियंते, कंत्राटदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पत्रादेवी ते धारगळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी धोकादायक दरड कोसळून महामार्गाची हानी होत असताना त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मालपे बायपास राष्ट्रीय महामार्ग तयार करत असताना कंपनीने रस्त्याच्या बाजूचे भले मोठे डोंगर सरळ रेषेत कापले. परिणामी संरक्षण भिंतीसह भलीमोठी दरड महामार्गावर आली. या दुर्घटनेबद्दल सरकार कंत्राटदारवर कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने सार्वजनिक हित लक्षात घेऊन कंत्राटदारावर लवकरात लवकर कारवाई करून रस्ता सर्व वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी होत आहे.

मालपे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम सुरू असताना गेल्यावर्षी या रस्त्याबाजूची दरड कोसळली होती. त्यावेळी हा रस्ता वाहनासाठी खुला नव्हता. त्या घटनेची दखल घेत सरकारने आणि कंत्राटदाराने बाजूला संरक्षण भिंत उभारले. परंतु संरक्षण भिंत उभारताना सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे दरड पुन्हा भिंतीसह रस्त्यावर कोसळली आहे.