केंद्राच्या कौशल्य भारत योजनेंतर्गत गोव्यात ६६ जणांना रोजगार

८७६ जण अप्रेंटिसशिपवर : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची माहिती

Story: समीप नार्वेकर। गोवन वार्ता |
10th September 2024, 11:40 pm
केंद्राच्या कौशल्य भारत योजनेंतर्गत गोव्यात ६६ जणांना रोजगार

पणजी : केंद्राच्या कौशल्य भारत योजनेमुळे गोव्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत या योजनेंतर्गत ६६ जणांनाच खासगी नोकऱ्या मिळाल्या आहेत तर ८७६ जण अप्रेंटिसशिप करत आहेत.

मंत्रालय देशभरातील कौशल्य विकास महामंडळांशी समन्वय साधते व मागणी आणि कुशल मनुष्यबळ यांच्यातील दरी भरून काढते. याशिवाय व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण योजना विकसित करते, कौशल्यांना प्रोत्साहन देते, नवीन कौशल्ये निर्माण करते आणि या योजनेद्वारे केवळ नोकऱ्याच नव्हे तर रोजगार निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवते. 


कौशल्य भारत या योजनेंतर्गत गोव्यात आतापर्यंत ६६ नोकऱ्या निर्माण झाल्या असून त्यापैकी २८ उत्तर गोव्यात आणि ३८ दक्षिण गोव्यात आहेत. ८७६ अप्रेंटिसशिप उमेदवारांपैकी ४८७ उत्तर गोव्यात आहेत आणि ३८९ अप्रेंटिसशिप  उमेदवार दक्षिण गोव्यात आहेत.

५ संस्था करतात काम

गोव्यातील पाच शैक्षणिक संस्था कौशल्य विकासासाठी काम करतात आणि प्रशिक्षण देतात. १८ आयटीआय, ८ प्रधानमंत्री विश्वकर्मा, ३ अकादमी आणि प्रत्येकी १ जन शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय उद्योजकता संस्था आणि लघु व्यवसाय विकास कौशल्य केंद्रे आहेत. योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात ३ पैकी उत्तरेत २ आणि दक्षिणेत एक मूल्यांकन केंद्रे आहेत. ३७ प्रशिक्षक आहेत, १४ उत्तरेत आणि २३ दक्षिण गोव्यात तर उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी एक मूल्यांकन अधिकारी आहे.