केंद्राचे कर्नाटकला निर्देश; भांडुराबाबतचा प्रस्ताव पाठवला परत
जोयडा : म्हादई नदीवरील भांडुरा नाला वळवण्यासाठी ७१ एकर वन जमीन वापरण्यास परवानगी मागणारा कर्नाटकचा प्रस्ताव फेटाळत, गोव्याने जानेवारी २०२३ मध्ये लिहिलेल्या पत्रावर सविस्तर उत्तर देण्याची सूचना केंद्रीय वन, पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने कर्नाटकला केली.
पाणी तंटा लवादाने १४ ऑगस्ट २०१८ रोजी म्हादईप्रश्नी अंतिम निवाडा देताना प्रकल्पातील ३.९० टीएमसी पाणी कर्नाटकला दिले. पैकी २.१८ टीएमसी पाणी भांडुरा नाल्यातून वळवण्याची कर्नाटकची योजना आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील नेरसा भागातील तीन गावांतील ७१ एकर वन जमीन पाईपलाईन, जॅकवेल, इलेक्ट्रिक सबस्टेशन आदी कामांसाठी वापरण्यास द्यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी २३ जुलै २०२४ रोजी वन मंत्रालयास पाठवला होता. परंतु, त्यास तूर्त नकार देत मंत्रालयाने हा प्रस्ताव कर्नाटकला परत पाठवला आहे.