एकूण बाधितांपैकी ५४.८५ टक्के केवळ चारच तालुक्यांतील
पणजी : राज्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात एचआयव्हीचा फैलाव अधिक आहे. २०१४ ते २०२३ या दहा वर्षांत आढळलेल्या एकूण एचआयव्ही बाधितांपैकी ५४.८५ टक्के बाधित हे प्रामुख्याने चार तालुक्यांतील होते. यामध्ये मुरगाव, बार्देश, सासष्टी आणि तिसवाडी या किनारी भागातील शहरी तालुक्यांचा समावेश आहे. तुलनेने धारबांदोडा, सत्तरी, काणकोण, सांगे या ग्रामीण तालुक्यात एचआयव्ही बाधितांची संख्या खूपच कमी आहे.
आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात २०१४ ते २०२३ दरम्यान एकूण ३११२ एचआयव्ही बाधित आढळले होते. यातील १७०७ बाधित हे मुरगाव, बार्देश, सासष्टी आणि तिसवाडी तालुक्यातील होते. याकाळात मुरगाव येथून सर्वाधिक ५१४ रुग्ण (१६.५१ टक्के) आढळले होते. यानंतर बार्देश येथून ४४६ (१४.३३ टक्के), सासष्टीमधून ४१५ (१३.३३ टक्के), तिसवाडीतून ३४० (१०.९२ टक्के) रुग्ण आढळले होते. २०१६ मध्ये मुरगावतालुक्यात सर्वाधिक ७८ रुग्ण आढळले होते. वरील कालवधीत अन्य कोणत्याही तालुक्यात एका वर्षात इतके रुग्ण आढळले नव्हते.
धारबांदोडा तालुक्यात सर्वांत कमी बाधित
शहरी तालुक्यांच्या तुलनेने ग्रामीण तालुक्यातील एचआयव्ही बाधितांची संख्या कमी आहे. २०१४ ते २०२३ दरम्यान सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी धारबांदोडा येथून सर्वात कमी १९ (०.६१ टक्के) बाधित आढळले होते. यानंतर काणकोणमधून ४० (१.२८ टक्के), सत्तरीतून ५० (१.६० टक्के), सांगेतून ७० (२.२४ टक्के), डिचोलीतून ७८ (२.५० टक्के) तर फोंड्यातून १६५ (५.३० टक्के) रुग्ण आढळले होते. गेल्या दहा वर्षांत धारबांदोडा मधील रुग्णसंख्या कधीही ५ च्या वर गेलेली नाही. तर काणकोणमध्ये २०१६ मध्ये सर्वाधिक ९ रुग्ण सापडले होते.
२५ टक्के बाधित राज्याबाहेरील
राज्यात २०१४ ते २०२३ या काळात ३११२ बाधितांपैकी ७७४ बाधित (२४.८८ टक्के) हे गोव्याबाहेरील होते. यामध्ये अन्य राज्यातील व्यक्ती, विदेशी नागरिक किंवा ज्यांनी आपले मूळ राज्य सांगितले नाही अशा व्यक्तींचा समावेश होतो. २०१४ ते २०२० दरम्यान तालुकानिहाय बाधितांची तुलना करता गोव्याबाहेरील व्यक्तींना एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण जास्त होते. २०२१ ते २०२३ दरम्यान हे प्रमाण कमी होत आले आहे.