अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती, तालिबान, आणि त्यांचे कायदे कानून या गोष्टींबाबत जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याने महिलांबाबत नवीन कायदे लागू केले आहेत. हे कायदे हलाल आणि हराम या दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. संयुक्त राष्ट्राने तालिबानच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. या कायद्यानुसार महिलांना घराबाहेर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी जाड कपड्याने अंग आणि चेहरा झाकून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महिलांना घरात देखील मोठ्या आवाजात गाणे म्हणणे आणि वाचन करणे यालाही मनाई केली आहे. या नवीन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महिला किंवा मुलींना कठोर शिक्षा दिली जाईल असा फतवा तालिबानने काढला आहे. तालिबानने या कायद्यांमागचे कारण देताना म्हटले आहे की, महिलांचा आवाज पुरुषांचे लक्षही विचलित करू शकतो. अशा जाचक नियमांना झुगारून ऑगस्ट २०२१ मध्ये माह नावाच्या तरुणीने अफगाणिस्तानातून पलायन केले होते. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये तालिबानचे सैन्य शिरल्यानंतर तिने या जाचक अटी, नियमांविरोधात हे पाऊल उचलले होते.
माह सध्या युकेमध्ये शिक्षण घेत असून या आठवड्यात ती इंग्रजीमध्ये माध्यमिक शिक्षणाची सुरुवात करणार आहे. आपल्या या शैक्षणिक आणि सामाजिक प्रवासाबद्दल बोलताना माह म्हणाली की, मी येथे खूप आनंदी, सुरक्षित आहे. आता मी मोकळेपणाने जगू शकते. पण, अफगाणिस्तानातील माझ्या मैत्रिणींना मात्र असा मोकळेपणा मिळत नाही, याचे मला वाईट वाटते. याची सुरुवात सांगताना माह म्हणाली की, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर मी अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातून पळ काढला आणि कंदहारला गेले आणि तिथून काबूलला गेले. अखेर इतर निर्वासितांबरोबर मी युकेला आल्यावर इतर निर्वासितांबरोबर मला आश्रय मिळाला. अफगाणिस्तान हे सध्या सुरक्षित ठिकाण नाही. पण, मी माझा देश विसरू शकणार नाही.
माह सध्या युकेतील कार्डिफमध्ये असून इंग्रजीमध्ये जीसीएसई पूर्ण केल्यास तिला वेल्समध्ये आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचारी म्हणून काम करता येणार आहे. गरोदर महिलांची काळजी घेण्यासंदर्भात तिचे कामकाज असून या शिक्षणामुळे, माझ्यासाठी असंख्य दरवाजे खुले झाले असल्याचे माह म्हणाली. माहसारख्या प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या स्त्रियांची आज समाजात गरज असून प्रतिकूल परिस्थितीत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणारी माह भारतातील युवा पिढीसाठी नक्कीच आदर्शवत आहे.
- गणेशप्रसाद गोगटे