कोलवा येथे घरासह कारवर झाड कोसळले, साडेसात लाखांचे नुकसान

दुसर्‍या घटनेत संरक्षक भिंतीवर पडले झाड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th September 2024, 06:10 pm
कोलवा येथे घरासह कारवर झाड कोसळले, साडेसात लाखांचे नुकसान

मडगाव : सेर्नाभाटी कोलवा येथील रॉय डिकॉस्टा यांच्या घरासह कारच्या शेडवर झाड पडले. यात चार कार, एक दुचाकीसह घराचे असे साडेसात लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान दुसर्‍या एका घटनेत शेडसह संरक्षक भिंतीवर झाड पडून १५ हजारांचे नुकसान झालेले आहे.

मडगाव अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेर्नाभाटी कोलवा येथील बसंती रेडिओ नजिक रॉय डिकॉस्टा यांच्या घरावर सकाळी सव्वा सातच्या सुमारास आंब्याचे मोठे झाड पडले. यात घराचे नुकसान झाले आहे. तसेच घराबाजूच्या शेडवर झाड पडून टोयाटो इनोव्हा कार, मोरिस व्हिंटेज कार, स्विफ्ट कार, टोयाटो इनोव्हा कारसह अस्सेस स्कूटरचेही नुकसान झाले आहे.

या घटनेत साडेसात लाखांचे नुकसान झाले तर मडगाव अग्निशामक दलाला ५० लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान, नोवा कोलवा येथील कुडतरकर गॅलेक्सी व्हिलानजिक जंगली झाड पडल्याने कार शेड, संरक्षक भिंतीचे १५ हजाराचे नुकसान झाले. याशिवाय रावणफोंड सर्कलनजिक रस्त्यावर झाड कोसळण्याची घटना दुपारी घडली होती.