२०२० सालचा १६२ इंचाच्या पावसाचा मोडला विक्रम
पणजी : राज्यात मान्सूनच्या पावसाने यंदा नवा विक्रम स्थापित केला आहे. राज्यात १ जून ते ९ सप्टेंबर दरम्यान सकाळी ८.३० पर्यंत सरासरी १६१.८१ इंच पावसाची नोंद झाली होती. दिवसभरात पडलेल्या पावसाने ही संख्या १६२ इंचाच्या पुढे गेली आहे. याआधी २०२० मध्ये सर्वाधिक १६२ इंच हंगामी पावसाची नोंद झाली होती. तर १९६१ मध्ये १६० इंच पावसाची नोंद झाली होती.
राज्यात पावसाची वार्षिक सरासरी १२९ इंच तर जून ते सप्टेंबर दरम्यानच्या हंगामी सरासरी ११३ इंच आहे. यंदा पावसाने हे दोन्ही विक्रम आधीच मोडीत काढले आहेत. हंगामी पाऊस संपण्यासाठी अजून २० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे एकूण हंगामी आणि वार्षिक पावसाची आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे. चोवीस तासांत राज्यात सरासरी १.३९ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान केपे येथे सर्वाधिक १.७७ इंच पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १० आणि ११ सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यानुसार या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १२ आणि १३ सप्टेंबर रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे.