मुख्य ऑलिम्पिमध्ये सव्वाशेच्या आसपास खेळाडू सहभागी झाले होते. त्यामुळे तिथे भारतीय खेळाडूंना अजूनही सोनेरी दिवस यायचे आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा खेळाडूंसारखीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा मुख्य ऑलिम्पिकमधून देशवासी ठेवत आहेत.
पॅ रिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी गौरवास्पद आहेच पण तितकीच ही कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मागचा विक्रम मोडून भारतीय खेळाडूंनी यंदा जास्त पदके मिळवल्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे सामने संपले आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जी पदके मिळवली होती, त्यापेक्षा जास्त पदके मिळून भारतीय खेळाडू परतीच्या प्रवासाला लागले आहेत. टोकियोच्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना १९ पदके मिळाली होती. यावेळी भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे २९ पदके मिळाली आहेत. अर्थातच यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मागचे विक्रम मोडीत काढून नवा विक्रम रचला.
अवनी लेखरा हिने नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देत सुवर्णपदकांच्या तक्त्यात भारताची वाट मोकळी करून दिली. पॅरालिम्पिक खेळाडूंमध्ये अवनी लेखरा ही २०२० मध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. आतापर्यंत तीन पदके अवनी हिच्या नावावर आहेत. यावेळी अवनीनेच सुवर्ण पदकांच्या यादीत पहिले पदक जोडले आणि त्यानंतर भारतीय खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवली. नऊ रौप्यपदके आणि १३ कांस्यपदके मिळवून २९ पदकांची संख्या करत आतापर्यंतचे सर्व विक्रम भारतीय खेळाडूंनी मोडले आहेत. टोकियोमध्ये झालेल्या २०२० च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके मिळवली होती. भारतीय खेळाडूंचा पॅरालिम्पिकमधील सहभाग जसा वाढत आहे तसाच पदकांचीही संख्या वाढत आहे. सर्व संकटांवर मात करून पॅरालिम्पिकमध्ये भारताचा ध्वज उंचावणाऱ्या या खेळाडूंच्या जिद्दीला आणि त्यांच्या विजयाला प्रत्येक भारतीय गौरवत आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे ५४ खेळाडू सहभागी झाले होते. यंदा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ८४ पॅरा भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता. पॅरालिम्पिकमध्ये १९७२ साली भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आलेला ‘चंदू चॅम्पियन’ नावाचा चित्रपटही हल्ली बराच गाजत आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये होत असलेले सकारात्मक बदल हे भविष्यात भारताला या स्पर्धेतील, एक प्रबळ देश होण्यासाठी मदत करणार आहे हे नक्की.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारत पदकांच्या यादीत अठराव्या स्थानावर आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय पॅरा खेळाडू या यादीत आपले स्थान भविष्यात आघाडीच्या देशांच्या यादीत आणतील हे यावरून अधोरेखित होते. हल्लीच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे इतर देशांचे भारतीय क्रीडा क्षेत्राकडे लक्ष आहे. त्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी केलेली कामगिरी ही त्याच मार्गाने देशाचे नाव उज्ज्वल करण्यास मदत करेल.
देशात क्रीडा क्षेत्रात होत असलेले बदल आणि क्रीडा क्षेत्राला दिलेले महत्त्व यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडू मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात पुढे येत आहेत. देशातील क्रीडा क्षेत्रावर विशेष लक्ष दिल्यास आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणावर खर्च करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून लक्ष दिले गेले तर पुढील काही वर्षांत भारतीय क्रीडा क्षेत्राला वैभव प्राप्त होऊ शकते. क्रीडा क्षेत्रात घुसलेले राजकारण दूर करण्यासाठी आणि खऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धांवर लक्ष केंद्रित करून खेळाडूंच्या विकासावर भर देण्याची गरज आहे. मुख्य ऑलिम्पिक स्पर्धा आणि पॅरालिम्पिक स्पर्धा या दोन्हीमध्ये भारतीय खेळाडूंनी देशासाठी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्या मानाने मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेत मोठे यश मिळत नसले तरीही खेळाडूंची कामगिरी चांगलीच आहे असे म्हणावे लागेल. मुख्य ऑलिम्पिकमध्ये अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, नेदरलँड, ब्रिटन, दक्षिण कोरिया, इटली, जर्मनी हे देश आघाडीवर असतात. तिथे भारत ७१ व्या स्थानावर आहे. पॅरालिम्पिकमध्ये ही स्थिती बदलली. आघाडीवर तेच देश असले तरी भारताने त्यात १८ व्या स्थानावर मजल मारली आहे. मुख्य ऑलिम्पिकमध्ये सव्वाशेच्या आसपास खेळाडू सहभागी झाले होते. त्यामुळे तिथे भारतीय खेळाडूंना अजूनही सोनेरी दिवस यायचे आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा खेळाडूंसारखीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा मुख्य ऑलिम्पिकमधून देशवासीय ठेवत आहेत.