मराठा आरक्षणासाठी एका वर्षापासून लढा सुरू असूनही आरक्षण मिळत नसेल, तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे मत मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. जरांगे पाटील यांचा हा निर्णय विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी नुकसानीचा ठरणार आहे.
गेल्या वर्षापासून मराठा आरक्षणासाठी पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, आश्वासने हवेत विरत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. कारण महाराष्ट्रात मराठा समाजाचा मोठा वर्ग आहे. यामुळे मराठा समाजाकडून उमेदवार उभे केल्यास अनेक आमदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले होते. मात्र, निर्णय घेतला नव्हता.
त्यांनी ७ ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. ‘शांतता संवाद यात्रे’द्वारे ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यांनी काढलेल्या शांतता रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाकडून प्रतिसाद मिळत आहे.
२९ ऑगस्टपर्यंत आरक्षण दिले तर विषय मिटणार आहे. आरक्षण न दिल्यास आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करुन टाकले आहे. त्यानुसार मोर्चेबांधणीस सुरुवातही केली. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात फटका बसला आहे. महायुतीच्या खासदारांची संख्या ४१ वरून १७ वर आली. त्यासाठी विविध कारणे असली तरी मराठा आरक्षणसुद्धा एक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते. महाराष्ट्रमध्ये यंदा प्रथमच ४८ खासदारांमध्ये २६ मराठा खासदार निवडून आले आहेत. ही टक्केवारी एकूण खासदारांच्या ६० टक्के आहे. अशाच प्रकारे येत्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा मराठा समाजाचे आमदार विक्रमी संख्येने निवडून येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाड्यामध्ये आठ पैकी आठ खासदार मराठा निवडून आले. छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली, तर इतर सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मराठा आरक्षणाचा मोठा फटका बसून पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मान्य केले आहे. मराठवाडा, विदर्भ, मुंबई, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा जरांगे फॅक्टरचा प्रभाव वाढत चालला आहे.
लोकसभेला समाजाने ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना विचार करण्याची वेळ आली आहे.
- प्रसन्ना कोचरेकर