पिळर्ण-पर्वरी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th September, 05:08 pm
पिळर्ण-पर्वरी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात

पणजी : देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. माणूस विवेकबुद्धी गहाण टाकत वासनेच्या आहारी जात माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करू लागला आहे. असाच एक प्रकार, बार्देश तालुक्यातील पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पिळर्णमध्ये घडला. येथे एका सुरक्षा रक्षकाने अवघ्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या आईने यासंदर्भात पर्वरी पोलीस स्थानकात रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

मूळ नेपाळ येथील व सध्या पिळर्ण येथे वास्तव्यास असलेल्या पीडितेच्या आईने नोंदवलेल्या फिर्यादीनुसार; ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता  मार्रा-पिळर्ण येथे सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या जलाम महोर  या मुळ ग्वाल्हेर-मध्यप्रदेश येथील व्यक्तीने अवघ्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तक्रार प्राप्त होताच पर्वरी पोलिसांनी अॅक्शन मोड मध्ये येत महोर यास ताब्यात घेत अटक केली. त्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, पोक्सो कायद्याच्या ८ आणि १२ तसेच गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अन्वये आज गुन्हा नोंदवण्यात आला.  दरम्यान संशयित महोरला म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे वडील देखील त्याच ठाणी सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. 

दरम्यान न्यायालयातून बाहेर येताना पत्रकारांनी त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आपणास या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असून आपण निर्दोष असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी उत्तर गोव्याचे अधीक्षक अक्षत कौशल,पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्त्वाखाली पर्वरी पोलीस स्थानकाच्या महिला उपनिरक्षक लॉरेन सिक्वेरा पुढील तपास करत आहेत



हेही वाचा