पितृपक्षामुळे गवंडाळी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September, 12:09 am
पितृपक्षामुळे गवंडाळी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब

पणजी : गवंडाळी येथील रेल्वे उड्डाणपुलाचा पायाभरणी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पितृपक्षात कोणतेही शुभकार्य होत नसल्याने या महिन्यात होणारा सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून शुभमुहूर्त सापडल्यानंतर ३ ऑक्टोबरनंतर या पुलाची पायाभरणी करण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.
वाळपई, साखळी, माशेल, आणि सावईवेरे येथून पणजीला येणारे लोक गवंडाळी  रस्त्याचा वापर करतात. मात्र, या रस्त्यांवर रेल्वे क्रॉसिंग असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक थांबवावी लागते. रेल्वे वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने रस्ता बंद असल्याने येथे वाहतूक कोंडी होते. काहीजण प्रवासादरम्यान वाहतुकीचे उल्लंघन करतात. गेली अनेक वर्षे या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी रेल्वे क्रॉसिंगच्या जागेवर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून मुख्यमंत्र्यांनी गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) मार्फत येथे उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या पुलाची १८ रोजी पायाभरणी होणार होती. मात्र, पितृपक्ष सुरू होत असल्याने जीएसआयडीसीने सदर काम थांबवले असून पुढील महिन्याच्या ३ किंवा ४ रोजी या पुलाची पायाभरणी अपेक्षित आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

हेही वाचा