सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवी फुलांना चोर्ला घाटात बहर

विवेकानंद पर्यावरण फौजतर्फे कारवी पुष्पोत्सवातून उलगडले कारवीचे जैविक महत्त्व

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th September, 12:15 am
सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवी फुलांना चोर्ला घाटात बहर

वाळपई : सात वर्षांनी फुलणारी कारवी चोर्ला घाटात बहरायला सुरुवात झाली आहे. या वनस्पतीची माहिती देणारा ‘कारवी पुष्पोत्सव’ नुकताच चोर्ला घाटातील म्हादई संशोधन केंद्राच्या परिसरात पार पाडला. या महोत्सवाला पर्यावरणप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि विद्यार्थी मिळून सुमारे १०० जणांनी उपस्थिती लावून कारवीची माहिती आणि त्याचे महत्त्व जाणून घेतले.

केरी सत्तरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजतर्फे कारवी पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, वनस्पतीशास्त्र अभ्यासक आणि हरमल येथील गणपत पार्सेकर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक अक्षत्रा फर्नांडिस व इतर वनस्पती अभ्यासकांनी कारवी फुलांच्या जीवन चक्राची माहिती दिली. अर्धा दिवस चाललेल्या या कार्यक्रमात अनेकांनी चोर्ला घाटाच्या परिसरात निसर्ग भ्रमंती करून कारवीचे सौंदर्य टिपले.

पश्चिम घाटाची धूप रोखण्यासाठी कारवीचे मोठे योगदान : अक्षत्रा फर्नांडिस

पश्चिम घाटाच्या वनस्पती विविधतेत कारवीला मोठे स्थान आहे. या जंगलात पाच प्रकारच्या कारवी प्रजाती आढळतात. त्यात सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवीला महत्त्वाचे स्थान आहे. सात वर्षांनी फुलल्यावर तिला बिया येतात आणि मग ती वनस्पती मरते. आपल्या जीवन चक्रात एकदाच फुलणारी ही वनस्पती असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जंगलाची धूप रोखण्यासाठी आणि दरडी कोसळण्यापासून रोखण्यासाठी कारवीची झाडे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे तिचे संवर्धन गरजेचे आहे. तिच्या पानावर पश्चिम घाटात असलेली फुलपाखरे, कृमिकिटकांचा अधिवास असतो. तर ती फुलल्यावर पक्षी, मधमाशा, कृमीकिटक यांच्यासाठी ती अन्न पुरवठा करीत असते, असे अक्षत्रा फर्नांडिस यांनी सांगितले.

लोकजीवनात कारवी : राजेंद्र केरकर

महोत्सवावेळी राजेंद्र केरकर यांनी कारवीचे लोक जीवनातील महत्त्व विषद केले. पूर्वीचा समाज आपल्या झोपड्यांचे छप्पर आणि झोपडीला सभोवताली भिंती उभारण्यासाठी कारवीच्या काठ्यांचा वापर करायचे. तर कारवी फुलल्यावर मधमाशांच्या पोळ्यांत वाढ होते. ती काढण्यासाठी पूर्वी लोक यायचे, असे केरकर यांनी सांगितले.

लक्ष्मी झर्मेकर यांचा गौरव

सुर्ला सत्तरी येथील ज्येष्ठ लोकगायिका आणि जंगलाच्या लोकजीवनाच्या जाणकार लक्ष्मी नागेश झर्मेकर यांना राजेंद्र केरकर यांच्या हस्ते नववारी कापड व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी म्हादई संशोधन केंद्राचे प्रमुख निर्मल कुलकर्णी, अक्षत्रा फर्नांडिस, विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

चोर्लातील कारवी फुलली आठ वर्षांनी

चोर्ला घाटात यंदा आठ वर्षांनी कारवी फुलली आहे. मागच्या वेळी २०१६ मध्ये ती याच काळात बहरली होती. सात वर्षांनी फुलणारी कारवी मागच्या वर्षी २०२३ मध्ये फुलणार अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमध्ये होती. सात वर्षे पूर्ण झाल्यावर आठव्या वर्षी फुलते, असा कयास पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होतो. मागच्या वर्षी मेळावली - गु्ळेली भागात फुलली होती तर २०२२ मध्ये ती निरंकालातील जंगलात फुलली होती.


हेही वाचा