दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सुविधा उभारण्यात सरकारला अपयश!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th September, 11:01 am
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सुविधा उभारण्यात सरकारला अपयश!

पणजी : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तेथून वारंवार रुग्णांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) पाठवण्यात येत आहे. या इस्पितळात सुविधा उभारण्यात सरकारला अपयश आले आहे. त्याचा फटका दक्षिण गोव्यातील जनतेला बसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.

पणजीतील पक्ष कार्यालयात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर आणि दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यावेळी उपस्थित होते. दक्षिण गोवा, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळे तसेच फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात विविध प्रकारच्या रुग्णांवरील उपचारांसाठीच्या साधनसुविधा उपलब्ध नाहीत. याची माहिती असतानाही ग्रामीण भागांतून गंभीर रुग्णांना तेथे पाठवले जाते. याउलट अशा रुग्णांना थेट गोमेकॉत पाठवल्यास संबंधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असेही पाटकर यांनी नमूद केले.

काँग्रेसला चाळीसही मतदारसंघांत बळकट करणार!

इंडिया आघाडीतील गोव्यातील घटक पक्ष एकसंध नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. आघाडीत बिघाडी झालेली आहे का? असा प्रश्न केला असता, राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील चाळीसही मतदारसंघांत काँग्रेसला बळकट करण्याचे ध्येय समोर ठेवून मी काम करीत आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात, असेही ते म्हणाले.

रस्ते कंत्राटदार, अभियंत्यांवर कारवाई करा!

राज्यात निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधलेल्या कंत्राटदार, अभियंत्यांवर सरकारने लवकरात लवकर कारवाई करून त्यांच्याकडून संबंधित रस्ते पुन्हा करून घेण्याची गरज आहे. खराब रस्त्यांबाबत काँग्रेसने आंदोलने सुरू केल्यानंतरच सरकारला जाग आल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा