ध्वनिप्रदूषण प्रकरण: तीन आस्थापनांनी सादर केले प्रतिज्ञापत्र; दोघांनी मागितली मुदत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th September, 06:00 pm
ध्वनिप्रदूषण प्रकरण: तीन आस्थापनांनी सादर केले प्रतिज्ञापत्र; दोघांनी मागितली मुदत

 पणजी : हणजूण परिसरात ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच आस्थापनांना गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवादी केले आहे. त्या आस्थापनांना न्यायालयाने नोटीस जारी करून बाजू मांडण्यास सांगितले. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत ३ आस्थापनांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, तर अन्य दोन अस्थापने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयशी ठरली असून त्यांनी यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान आज झालेल्या सुनावणी वेळी, न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळास सदर आस्थापनांचे निरीक्षण करून त्यांची जागा आणि इतर  माहिती देण्यास सांगितले.  याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, उर्वरित आस्थापनांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल अशी माहिती एजी देविदास पांगम यांनी गोवन वार्ताशी बोलताना दिली.

या प्रकरणी सागरदीप शिरसईकर यांनी उच्च न्यायालयात यांनी किनारी परिसरातील ध्वनिप्रदूषणाबाबत याचिका दाखल केली होती. ‘ध्वनिप्रदूषण (नियम व नियंत्रण) कायदा २०००’ आणि ‘पर्यावरण संरक्षण कायदा आणि नियम’ यांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली होती.सुनावणी सुरू असताना शिरसईकर यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. न्यायालयाने शिरसईकरला वगळून डेस्मंड अाल्वारिस यांना याचिकादार करण्यास मंजुरी दिली. अर्नोल्ड डिसा यांनी नाईट क्लब, बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, तसेच वैयक्तिक पातळीवर उत्तररात्री खुल्या जागेत पार्ट्या होत असल्याचा मुद्दा मांडला होता. खंडपीठाने रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. तरीदेखील ध्वनिप्रदूषण सुरूच असल्याचे समोर आले.  

नोटीस बजावलेली आस्थापने

- हणजूण येथील डायज पूल क्लब अॅण्ड बार

- वंझरात-वागातोर येथील नोहा गोवा

- वाडी-शिवोली येथील थलाशा

- शापोरा येथील बार हायफाय

- हडफडे येथील हाऊस आॅफ आरपोरा   



हेही वाचा