पाण्यासाठी हणजूण-कायसूवच्या ग्रामस्थांचा घागर मोर्चा

अभियंत्यांना विचारला जाब : १५ दिवसांत पाणी प्रश्न सोडवा!

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September, 11:57 pm
पाण्यासाठी हणजूण-कायसूवच्या ग्रामस्थांचा घागर मोर्चा

म्हापसा : हणजूण - कायसूव पंचायत क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून अनिमयित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त रहिवाशांनी दत्तवाडी, म्हापसा येथील साबांखाच्या पाणीपुरवठा विभाग कार्यालयावर घागर मोर्चा काढला. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी रहिवाशांनी अधिकाऱ्यांना १५ दिवसांचा वेळ देत गाव बंदचा इशारा दिला. ही समस्या सुटेपर्यंत ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणारे लेखी हमीपत्र रहिवाशांनी अभियंत्यांकडून लिहून घेतले.

हणजूण-कायसूवच्या ग्रामस्थांनी मंगळवारी पाणी पुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा आणला. गावात भूमिगत वीजवाहिन्याच्या कामावेळी जलवाहिन्या फुटल्या. या जलवाहिन्या चाळीस वर्षांपूर्वीच्या असून त्यांना गळती लागली असून त्यात मृत उंदीर, प्लास्टिक, पालापाचोळा, चप्पल व इतर कचरा मोठ्या प्रमाणात आढळला. या जलवाहिन्या देखभालीअभावी तंबून राहिल्याचा आरोप रहिवाशांनी केला. सहाय्यक अभियंता रणधीर अष्टेकर व कनिष्ठ अभियंता तनय कांदोळकर यांना जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

बादे येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेर हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर पाणी पुरवठ्यात सुधारणा होईल, असे सहाय्यक अभियंता रणधीर अष्टेकर यांनी ग्रामस्थांना सांगितले.

माजी पंच सदस्य हनुमंत गोवेकर म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. तरीही हणजूण-कायसूवच्या लोकांना पाणी पुरवठ्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.

यावेळी सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, तसेच सामाजिक कार्यकर्ता पार्वती नागवेकर यांनीही साबांखाच्या पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका केली. सरकारने यात लक्ष घालून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी केली.

लोक रस्त्यावर उतरणार : गोवेकर

नळाला अनियमित पाणी येते. मात्र, तेही दिवसाआड आणि रात्रीच्या वेळीच येते. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. परंतु पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांना हे दिसत नाही. ही समस्या आगामी पंधरा दिवसांत न सोडवल्यास लोक रस्त्यावर उतरणार, असा इशारा माजी पंच सदस्य हनुमंत गोवेकर यांनी दिला. 

हेही वाचा