राजभवनातील १०० वर्षे जुन्या झाडांवर आयुर्वेदिक उपचार

राज्यपालांचे सचिव एम.आर. राव यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September, 12:11 am
राजभवनातील १०० वर्षे जुन्या झाडांवर आयुर्वेदिक उपचार

पणजी : राजभवनात असलेल्या १०० वर्षे जुन्या झाडांची तपासणी करून त्यावर उपचार करण्यासाठी वृक्ष आयुर्वेद चिकित्सा हा उपक्रम मंगळवारी सुरू करण्यात आला. गोव्यात झाडांची काळजी घेण्याची पद्धत प्रथमच राजभवनात सुरू करण्यात येत आहे, असे राज्यपालांचे सचिव एम.आर. राव यांनी सांगितले.
राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राव बोलत होते. गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली वन आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विशेषत: औषधी वनस्पतींच्या जतनासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. औषधी वाटीका, चंदन आणि फणसाच्या झाडापासून अर्क, वामन वृक्ष उद्यान राजभवनात सुरू करून पौराणिक भारतीय आयुर्वेदाचे संस्थापक आणि सुर्शुता सर्जरीचे संस्थापक यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन होणार असल्याचे राव यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार असून ही उपचार पद्धती करण्यासाठी केरळ येथून आयुर्वेदिक संवर्धनवादी डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे गोवावासीयांना, विशेषतः तरुणांना त्यांचा नैसर्गिक वारसा आणि परंपरा जपण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा राव यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी राजभवनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रथम राजभवन कांपाल येथे प्रार्थना केली जाईल त्यानंतर गणेश मंदिर आणि श्वेता कपिला गोशाळेत पूजा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या वाढदिनानिमित्त ७ झाडांना नवसंजीवनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १७ रोजी राजभवनातील १०० वर्षे जुन्या सात झाडांना नवसंजीवनी देण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी राजभवनने वृक्ष आयुर्वेद चिकित्सा किंवा पोषण योग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया वृक्ष आयुर्वेद या दुर्मिळ विज्ञानाच्या तत्त्वावर आधारित असेल, असे राव यांनी सांगितले.

हेही वाचा