भाजपविरोधी आघाडीचे दार आरजीसाठीही खुले : व्हिएगस

गोवा वाचवण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September, 12:19 am
भाजपविरोधी आघाडीचे दार आरजीसाठीही खुले : व्हिएगस

पणजी : गोवा वाचवण्यासाठी गोव्यातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आपच्या आघाडीचे दरवाजे रिव्हॉल्युशन्स गोवन्सला (आरजी) ही खुले आहेत. त्यामुळे भाजपविरोधी आघाडीत सामील होण्यासाठी आरजीशी चर्चा करणार, असे आपचे आमदार वेन्झी व्हिएगास यांनी सांगितले. प्रुडंट मीडियाच्या ‘हेड ऑन’ कार्यक्रमात आमदार वेन्झी व्हिएगास यांनी ही माहिती दिली. प्रुडंट मीडियाचे मुख्य संपादक प्रमोद आचार्य यांनी सदर मुलाखत घेतली.व्हिएगास म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. राज्यात भ्रष्टाचारासह डोंगर कापणीचे प्रकार सुरू आहे. पूर्वी कायद्यातील पळवाटा वापरून जमिनीचे रूपांतरण तसेच डोंगर कापणी केली जात होती. मात्र, आता कायद्यात दुरुस्ती केली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे अनेक खाती असून सार्वजनिक बांधकाम खातेही त्यांच्याकडे आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात त्यांना अद्यापही यश आलेले नाहीत. यावरून सरकारचे तसेच मुख्यमंत्र्यांचे अपयश सिद्ध होते, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आरजीशी झाली चर्चा
लोकसभा निवडणुकीपूर्वी मी स्वत: आरजीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. बाणावली जिल्हा पंचायत निवडणुकीच्या वेळीही आपने आरजीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. सध्या आपकडे ज्या जागा आहेत त्या आपला सोडाव्या लागतील. फातोर्डाची जागा गोवा फॉरवर्डला सोडावी लागणार आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत, त्या तीन जागा काँग्रेसकडे असतील या तत्त्वाने आघाडी होणार आहे. इतर मतदारसंघात क्षमतेनुसार जागा वाटप करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आप भाजपची बी टीम नसल्याचे सिद्ध
भाजपात राजकीय नितीमत्ता, प्रामाणिकपणा नाही. मात्र, या पुढील राजकारण निष्पक्ष आणि प्रामाणिकपणाचे असेल. आपचे पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात निष्पक्षता आणि प्रामाणिकपणा आणला. भाजप सरकारने दारू प्रकरणी आप आणि केजरीवाल यांना रोखून पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आप एकसंध आहे. या संपूर्ण प्रकरणाने हे सिद्ध केले आहे की आप ही भाजपची ‘बी टीम’ नाही, असे व्हिएगस म्हणाले.

हेही वाचा