पंतप्रधान कौशल्य विकास योजनेखाली गोवा पर्यटनाला पसंती

राज्यातील ४४३ पैकी ३०६ जणांनी केले प्रशिक्षण पूर्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September, 12:02 am
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेखाली गोवा पर्यटनाला पसंती

समीप नार्वेकर

पणजी : पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत गोव्यातील नोंदणी केलेल्या ४४३ पैकी ३०६ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून २२४ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. पर्यटन क्षेत्रात गोमंतकीयांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. तर स्ट्रीट फ्रुड व्यवसायाला सर्वाधिक मागणी आहे, अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने दिली.
या योजनेअंतर्गत पर्यटन आणि आदारातिथ्य क्षेत्रात २१२, सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रात १३५, आयटी क्षेत्रात ३४, बांधकाम क्षेत्रात ३०, अन्न प्रक्रिया क्षेत्र आणि व्यवस्थापन क्षेत्रात प्रत्येकी १६ जणांची नोंदणी झाली आहे. व्यवसायांच्या बाबतीत सहाय्यक इलेक्ट्रीशियन ३०, क्राफ्ट बेकर्स आणि सुरक्षा रक्षक यांसारख्या इतर क्षेत्रांसाठी प्रशिक्षित केले जात आहे. ४४३ पैकी २५८ उत्तर गोव्यात नोंद झाले आहेत. यापैकी २५७ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, २१४ जणांचे मूल्यांकन झाले असून १८५ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यात सात बॅचेसचे प्रशिक्षण घेण्यात आले असून सर्व बॅचेस पूर्ण झाल्या आहेत.
उत्तर गोव्यात, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात २१२, बांधकाम क्षेत्रात ३० आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात १६ जण नोंदणीकृत आहेत. बांधकाम क्षेत्राचे प्रशिक्षण सत्तरी आयटीआयमध्ये चालते. अन्न प्रक्रिया क्षेत्राचे प्रशिक्षण डिचोली आयटीआय येथे, तर पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण सेंट जॉन एज्युकेशन सोसायटीमध्ये चालते. तर दक्षिण गोव्यात १८५ जणांची नोंद असून यापैकी ४९ जणांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून ४४ जणांचे मूल्यांकन सुरू आहे आणि ३९ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
यातील आठ बॅचेसनी प्रशिक्षण घेतले असून ५ बॅचेस पूर्ण झाल्या तर ३ बॅचेसमध्य प्रशिक्षण सुरू आहे. १३५ सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रात, ३४ आयटी आणि १६ व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण वास्को येथील ब्रायट फ्युचर डॉट कॉम प्रा. लि. येथे चालते. आयटी क्षेत्राचे प्रशिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, काणकोण आणि मडगाव आयटीआयमध्ये केले जाते, तर व्यवस्थापन क्षेत्रातील प्रशिक्षण सीआयएसएस सर्व्हिसेस लिमिटेड कुठ्ठाळी येथे सुरू आहे.
मार्च २०२३ ते आतापर्यंत ४४३ जणांची नोंदणी
मार्च २०२३ ते १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत ४४३ गोवावासीयांनी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. त्यांना १५ बॅचमध्ये प्रशिक्षण दिले जाते. १५ पैकी १० बॅचेस पूर्ण झाल्या आहेत तर ५ बॅचेस सुरू आहेत. यात ११३ जणांचे प्रशिक्षण सुरू असून ३०६ जणांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी २२४ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले असून २५८ जणांचे मूल्यांकन झाले आहे. गोव्यात सहा क्षेत्रांमध्ये सहा व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी ७ प्रशिक्षण भागीदार आणि ८ प्रशिक्षण केंद्रे आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.

हेही वाचा