साखळी नगरपालिका करणार सिंगल युज प्लास्टिक विरोधात कारवाई

प्लास्टिक पिशव्या देणाऱ्यांबरोबरच वापरणाऱ्यांनाही देणार दंड.

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
17th September, 12:17 am
साखळी नगरपालिका करणार सिंगल युज प्लास्टिक विरोधात कारवाई

साखळी : सिंगल यूज प्लास्टिक देणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबरच आता ती मागणाऱ्या ग्राहकांनाही साखळी नगरपालिका दंड देणार आहे. या विषयी साखळी बाजारात २१ दिवस जागृती केल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार. ही मोहीम केवळ साखळी स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी नसून साखळीवासीयांना तसेच बाजारात येणाऱ्या लोकांना कँसरसारख्या भयानक आजारापासून वाचविण्यासाठी असल्याचे नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी बाजारातील जागृती मोहिमेदरम्यान सांगितले.

गोवा कचरा व्यवस्थापन मंडळ, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, मिनरल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व गोदरेज कंपनीच्या सिएसआर अंतर्गत साखळी बाजारात जागृती मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व इतर अधिकारी, युवा उपस्थित होते.

साखळी बाजारात या संदर्भात जागृती करणारी भित्तीपत्रके प्रत्येक दुकानावर चिकटविण्यात येत आहेत. तसेच दुकानदारांनाही याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन करण्यात येत असून प्लास्टिकच्या जास्त वापरासाठी केवळ दुकानदारच जबाबदार नसून सामान घेतल्यानंतर पिशव्या मागणारे तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे दुकानदारांचा नाईलाज होत असतो.

त्यासाठी ग्राहकांनीही बाजारात येताना कापडी पिशव्या घेऊन याव्यात, असे आवाहन नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी केले.

पुढील २१ दिवस ही जागृती करत असतानाच कोणकोणत्या सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालू शकते यावर चर्चा करणार आहे. तसेच सर्वांना बरोबर घेऊन जागृती, मार्गदर्शनही करणार व नंतरच दंडात्मक कारवाई सुरू करणार असेही साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मिनरल फाऊंडेशनच्या प्रकल्प संचालिका श्रध्दा रांगणेकर यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली. बाजारात सर्व दुकाने व विक्रेत्यांकडे फिरून मार्गदर्शन करण्यात आले.       

हेही वाचा