बांबोळी राष्ट्रीय महामार्गावर धावत्या टाटा सुमोला आग

चालकाच्या प्रसंगावधान राखून सुमो थांबवल्यामुळे मोठ्या अनर्थ टळला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th September, 12:15 am
बांबोळी राष्ट्रीय महामार्गावर धावत्या टाटा सुमोला आग

पणजी : बांबोळी येथील नेक्सा शोरूम जवळ राष्ट्रीय महामार्गावर धावत्या टाटा सुमोला आग लागण्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या आगीत सुमो पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागली त्यावेळी सुमोमध्ये गोमेकाॅत सेवा बजावणारे कर्मचारी होती.

या वेळी सुमो चालकाने प्रसंगावधान राखून सुमो थांबवली आणि सर्व कर्मचारी बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी आगीची दुर्घटना म्हणून नोंद केली आहे.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, बांबोळी येथील नेक्सा शोरूम जवळ सोमवारी सुमारे ५.२९ वाजता राष्ट्रीय महामार्गावर टाटा सुमो मधून धूर येत असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती.

त्यानुसार, पणजी अग्निशमन दलाचे स्टेशन फायर ऑफीसर रुपेश सावंत याच्या मार्गदर्शनाखाली लिंडिग फायर फायटर अमित रिवणकर याच्या नेतृत्वाखाली ड्रायव्हर ऑपरेटर संतोष कळंगुटकर, फायर फायटर सत्यवान गावस, विठ्ठल शिंदे, प्रितेश पाळणीकर व इतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

लगेच आगीवर पाण्याचा मारा सुरू करून आग विझवण्यात आली. तो पर्यंत टाटा सुमो पूर्णपणे खाक झाली होती. या वेळी जुने गोवा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी टाटा सुमोच्या चालकांशी अधिक चौकशी केली असता समजले की, तो बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन पणजीच्या दिशेने जात होता. बांबोळी राष्ट्रीय महामार्गावर नेक्सा शोरूम जवळ पोहचताच सुमोच्या पुढच्या भागातून धूर येत असल्याचे समजले. त्यानंतर त्याने लगेच सुमो बाजूला घेतली आणि सर्व कर्मचाऱ्यांना खाली उत्तरले.

त्यानंतर लगेच सुमोला आगीने पेट घेतला. त्यावेळी चालकाच्या प्रसंगावधान राखून सुमो थांबवल्यामुळे मोठ्या अनर्थ टळला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी आगीची दुर्घटना म्हणून नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.              

हेही वाचा