दक्षिण गोवा : वार्कात पाच दुकाने फोडली तर मडगावातही दुकानात चोरी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th September, 03:51 pm
दक्षिण गोवा : वार्कात पाच दुकाने फोडली तर मडगावातही दुकानात चोरी

मडगाव : गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली असतानाच चोरट्यांनीही दुकानांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. वार्कात फार्मसीसह पाच दुकाने फोडत रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरी केला. मडगावातही एका दुकानाचे शटर उघडून पाच हजार व मिठाई चोरी करण्यात आली.

गणेश उत्सवाच्या तयारीत नागरिक सध्या व्यस्त आहेत. पोलिसांकडून गस्त घालण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असे  असतानाच मडगावात पालिका इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या पोलीस स्थानकापासून एका किलोमीटरापेक्षाही कमी अंतरावरील रस्त्याबाजूचे पंजाबी लस्सीचे मिठाई दुकानाचे शटर गुरुवारी रात्री चोरट्यांनी उघडले. दुकानातील पाच हजारांची रोकड तसेच मिठाई चोरट्यांनी लंपास केली. पहाटे दुकानमालकाला याची माहिती मिळताच त्याने मडगाव पोलिसांत याची तक्रार नोंदवली.

दुसरीकडे वार्का, फात्राडे परिसरातील फार्मसी व वाईन शॉप अशा पाच दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दोघा चोरट्यांनी दुचाकीवरुन येत शटर उघडून दुकानात प्रवेश करत चोरी केल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अपोलो फार्मसीसह आणखी एक फार्मसीला चोरट्यांनी लक्ष्य केले. एका फार्मसीतून १ लाख २५ हजार तर अपोलो फार्मसीतून ४७ हजारांची रोख रक्कम, वाईन शॉपमधून काही सामानाची चोरी चोरट्यांनी केली. वार्का व फात्राडे परिसरातील पाच दुकानांतून रोख रकमेसह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. कोलवा पोलिसांकडून घटनास्थळी जात पाहणी करण्यात आली असून, याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे. उत्सवाच्या काळात चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांकडून गस्तीत वाढ करावी अशी मागणी नागरिकांकडून व दुकानदारांकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा