पणजी: आयपीएचबीमधील वरिष्ठ लिपिक २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी निलंबित; गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th September, 03:35 pm
पणजी: आयपीएचबीमधील वरिष्ठ लिपिक २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी निलंबित; गुन्हा नोंद

पणजी : आपल्या पदाचा गैरवापर करून लाखोंची अफरातफर केल्या प्रकरणी आयपीएचबी (मानसोपचार आणि मानवी वर्तणूक संस्था) च्या वरिष्ठ सरकारी लिपिकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यास निलंबित करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या लिपिकाने गेल्या ५ वर्षांत आपल्या पदाचा गैरवापर करत आयपीएचबीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारातील तब्बल २४ लाख रुपये परस्पर आपल्या खात्यात वळवले. 

अप्पर डिव्हिजन क्लर्क यापदावर कार्यरत असलेल्या संशयिताला अंतर्गत चौकशी नंतर दोन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एका कर्मचाऱ्याने त्यांच्या पगारातून कर्ज आणि विमा प्रीमियम कपातीमधील तफावतींबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर फसवणूक उघडकीस आली होती. यामुळे अंतर्गत तपास सुरू झाला, व त्यात  कपात केलेला निधी लिपिकाच्या वैयक्तिक खात्यात वळवला जात असल्याचे उघड झाले.

आयपीएचबीच्या अधिकाऱ्यांनी पणजी उपधीक्षकांकडे  यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, लिपिकाकडे कर्मचाऱ्यांच्या संबंधित कर्ज किंवा विमा खात्यांमध्ये निधी वितरित करण्याची जबाबदारी होती. याचाच फायदा घेऊन, संशयिताने  स्टेट बँक ऑफ इंडियामधील त्याच्या वैयक्तिक खात्यात कर्मचारी कर्ज सेवा आणि विमा प्रीमियमसाठी निधी वळवत करून सिस्टममध्ये फेरफार केला. दरम्यान गेली पाच वर्षे हा प्रकार सुरू होता. कुणाच्याही मनात संशय निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या रकमेची कपात केली जात होती. जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्जाच्या पेमेंटमधील विसंगतीबद्दल प्रश्न केला तेव्हा सदर लिपिकाने त्यांना हा मुद्दा न वाढवण्याचा सल्ला दिला.

एका वरिष्ठ आयपीएचबी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी व यात संलग्न इतरांची ओळख पटवण्यासाठी एक विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली आहे.  

सध्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून संशयित लिपिकाचे पगार आणि वैयक्तिक बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. त्याने एकट्यानेच कृत्य केल्याचे दिसून येत असले तरी अधिकाऱ्यांना यात इतर व्यक्तींचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. इतर अनेक गोष्टी पुढील पोलीस तपासातून स्पष्ट होत जातील. महत्त्वाचे म्हणजे याप्रकारांमुळे माध्यम व कमी वेतन श्रेणी असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. 



हेही वाचा