विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी हुंडा बळीचा गुन्हा दाखल

सासू, सासरा, नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:26 am
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी हुंडा बळीचा गुन्हा दाखल

म्हापसा : करासवाडा म्हापसा येथे २०१४ मध्ये घडलेल्या दीपाली दीपेश शेटकर (३१) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासू, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांत हुंडाबळीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दीपालीच्या वडिलांच्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला हाता. त्यानुसार उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली असता पोलिसांनी विवाहितेचे सासरे जगन्नाथ शेटकर, सासू अनुराधा शेटकर व नणंद समिक्षा शेटकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४(ब) व ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आत्महत्येची घटना दि. १२ मे २०१४ रोजी घडली होती. पीडितेने आपल्या सासरी गळफास घेत आत्महत्या केली होती. दीपाली हिने विवाहाच्या सहा महिन्यांनी हे पाऊल उचलले होते.

हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करून तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी गुन्हा नोंद न केल्यामुळे त्यांनी म्हापसा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित जगन्नाथ शेटकर यांचा मृत्यू झाला आहे. तर अनुराधा ही आजारपणामुळे अंथरुणावर आहे. तर, समिक्षा हिचे लग्न झाले आहे. दरम्यान, तिचा पती दीपेश हा देखील मूकबधीर आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा