दक्षिण गोव्यात २९ डोंगर कापणी, २१ जमीन बुजविण्याचे प्रकार उघडकीस

५० जणांवर प्रशासनाकडून कारवाई : कारणे दाखवा नोटीस जारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th September, 12:19 am
दक्षिण गोव्यात २९ डोंगर कापणी, २१ जमीन बुजविण्याचे प्रकार उघडकीस

पणजी : दक्षिण गोव्यात १ जानेवारी ते १५ ऑगस्ट या कालावधीत २९ डोंगर कापणी आणि २१ मातीचा भराव घालून जमीन बुजवण्याचे प्रकार मिळून ५० जणांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या प्रकरणी दक्षिण गोवा भरारी पथकाने पाहणी करून संबंधितांना काम बंद आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात सर्वाधिक सासष्टी तालुक्यात २० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ३५ अज्ञातांविरोधात तक्रारी आल्या आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी आणि मातीचा भराव टाकून जमीन बुजवण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने कडक पावले उचलली. दरम्यान, केरळमधील वायनाडमध्ये घडलेल्या घटनेनंतर सतर्क झालेल्या राज्य सरकारने राज्यात कुठेही डोंगरकापणी सुरू असली तरी त्याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपवली आहे. राज्य आपत्कालीन यंत्रणेच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत:च तशी घोषणा केली होती.

याची दखल घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ए. अश्विन चंद्रू यांनी हल्लीच आदेश जारी केला आहे. त्यात त्यांनी डोंगर कापणी तसेच भराव घालण्याच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासह त्या संदर्भातील अहवाल देण्यासाठी तलाठ्यांना शनिवार, रविवार आणि इतर सुटीच्या दिवशीही निरीक्षण करण्याची सक्ती केली आहे. तसेच तलाठ्यांना मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

दरम्यान, १ जानेवारी ते १५ ऑगस्ट या कालावधीत दक्षिण गोव्यात २९ डोंगर कापणी आणि २१ मातीचा भराव टाकून जमीन बुजवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी व्हेल्टन टेलीस यांनी आदेश जारी करून संबंधितांना काम बंद आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याच कालावधीत ३५ प्रकारांत उल्लंघन करणाऱ्यांची माहिती मिळाली नाही.

वरील कालावधीत सासष्टी तालुक्यात सर्वाधिक २० जणांवर कारवाई केली आहे. त्यानंतर केपे ११, फोंडा ७, काणकोण ४, तर धारबांदोडा आणि मुरगाव तालुक्यात प्रत्येकी ३ आणि सांगे तालुक्यात दोघांवर कारवाई केली आहे. याशिवाय अज्ञात व्यक्तींकडूनही डोंगर कापणी आणि मातीचा भराव टाकून जमीन बुजवण्यात आल्याचे ३५ प्रकार समोर आले आहेत. यात सर्वाधिक सासष्टी तालुक्यात ९, केपे ८, फोंडा ५, धारबांदोडा ३ तर सांगे आणि काणकोण तालुक्यात प्रत्येकी २ प्रकार समोर आल्यानंतर कारवाई केली आहे. यासंदर्भात संबंधित खात्याकडे जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार करून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.

संबंधित खात्याचा चालढकलपणा

जिल्हा प्रशासनाने संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार करून माहिती दिली. तसेच या संदर्भात कारवाई करून कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, संबंधित खात्याकडून अजून काहीच अहवाल सादर करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा