सांकवाळ येथील हाऊसिंग प्रकल्प रद्द न झाल्यास रास्तारोको!

काँग्रेस नेते, समाज कार्यकर्त्यांचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th September 2024, 12:29 am
सांकवाळ येथील हाऊसिंग प्रकल्प रद्द न झाल्यास रास्तारोको!

वास्को : सांकवाळ येथील डोंगराळ भागातील नियोजित मेगा हाऊसिंग प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या रद्द करा. गोवेकरांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नका, असे आवाहन काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. हा प्रकल्प रद्द झाला नाही, तर रस्ता बंद करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

नियोजित मेगा हाऊसिंग प्रकल्पाला विरोध होत आहे. सदर प्रकल्प आम्हाला नकोच अशी भूमिका घेतली जात आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, माजी मंत्री एलिना साल्ढाणा, सांकवाळचे पंच मौर्लिओ कार्व्होलो, सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी तसेच स्थानिक रहिवासी, इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या प्रकल्पाच्या जागेला पुन्हा भेट देऊन पाहणी केली.

युरी आलेमाव यांनी तेथे बाऊंसरच्या उपस्थितीबद्दल आश्र्चर्य व्यक्त केले. डोंगर कापणीमुळे गोव्यात वायनाडसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. येथील डोंगराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आपला प्रतिनिधी किंवा तलाठी यांना पाठविण्याची गरज होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याची शक्यता आहे. प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्या. वेळप्रसंगी येथील रस्ता बंद करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार फर्नांडिस यांनी सांगितले की, या डोंगरात रानवनस्पती, वन्यप्राणी आहेत. ती डोंगरकापणीमुळे ही संपत्ती नष्ट होण्याची भीती आहे.

आमदार डिकॉस्टा, अमित पाटकर, एलिना साल्ढाणा, शंकर पोळजी, पंच कार्व्हालो यांनी विचार मांडले. 

हेही वाचा