म्हापसा : सिकेरी समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचे कुजलेल्या अवस्थेत शीर आढळून आले आहे. या शीरावर लांब केस आणि नाकात नथ असल्यामुळे ते महिलेचे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच कळंगुट समुद्रकिनारी वाहून आलेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
मंगळवारी सकाळी सिकेरी समुद्रकिनारी खडकाळ भागात वाहून आलेले शीर जीवरक्षकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कळंगुट पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ते शीर पाण्यातून बाहेर काढले. हे शीर कुजलेले होते. त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र, नाकात नथ आणि डोक्यावर लांब केस होते. त्या व्यक्तीचे शीर कापून नंतर ते समुद्रात फेकले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी पंचनामा करून हे शीर शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिले आहे. शवचिकित्सेनंतर हे शीर महिला की पुरूषाचे हे स्पष्ट होणार आहे. पुढील तपास कळंगुट पोलीस व पणजी किनारी सुरक्षा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कळंगुट समुद्रकिनारी वाहून आलेला ३०-३५ वयोगटातील युवकाचा मृतदेह सापडला. जीवरक्षकांनी हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे.