अखिलेश कुमार साहनी​ला गब्बर खूनप्रकरणी जामीन

कॉल रेकॉर्ड सोडल्यास प्रथमदर्शनी ठोस पुरावे नाहीत

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th September 2024, 12:21 am
अखिलेश कुमार साहनी​ला गब्बर खूनप्रकरणी जामीन

पणजी : मिर्झापूर -उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून चंद्रिका उर्फ गब्बर सहानी (३२, रा. उत्तर प्रदेश) याचा ऑगस्ट २०२३ मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित अखिलेश कुमार साहनी याचे इतर संशयितांबरोबर काॅल रेकाॅर्ड सोडल्यास त्याच्याविरोधात प्रथमदर्शनी ठोस पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने साहनी याला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. भारत देशपांडे यांनी दिला.

या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, रविवार, २७ ऑगस्ट २०२३ रोजी दांडो-करमळी येथील मानशीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर जुने गोवा पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्याच दरम्यान पर्वरी पोलीस स्थानकात २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रिका उर्फ गब्बर सहानी बेपत्ता असल्याचे समोर आले होते. त्या तक्रारदाराला जुने गोवे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले असता, त्याने मृतदेह गब्बरचा असल्याचे सांगितले. तसेच गब्बरची मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथे जमिनीच्या वादावरून चुलत भावांसोबत वाद झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्याचे चुलत भाऊ राजेंद्र प्रसाद, रणजीत प्रसाद, राजकुमार प्रसाद या तिघांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गब्बरला मारहाण केल्यानंतर गवंडाळी पुलावरून पाण्यात फेकून दिल्याचा जबाब दिला. त्याची दखल घेऊन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून राजेंद्र प्रसाद, रणजीत प्रसाद, राजकुमार प्रसाद याच्यासह अखिलेश कुमार साहनी या चाैघांना अटक केली. याच दरम्यान पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात वरील संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर वरील संशयितांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून दिला.

याप्रकरणी सुनावणी झाली असता न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित अखिलेश कुमार साहनी याला ५० हजार रुपयांच्या हमीवर, तसेच इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.

संशयित अखिलेश कुमार साहनी याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी संशयित साहनी याच्यातर्फे अॅड. रोहन देसाई यांनी बाजू मांडून आपल्या अशिलाचा खून प्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला. तसेच त्याच्याविरोधात इतर संशयितांबरोबरचे काॅल रेकॉर्ड सोडल्यास आणखीन काहीच पुरावे नसल्याचा दावा केला. 

हेही वाचा