रशियन गुप्तहेर मानल्या जाणाऱ्या ह्वाल्दिमीर व्हेलचा मृत्यू

Story: विश्वरंग |
03rd September, 11:57 pm
रशियन गुप्तहेर मानल्या जाणाऱ्या ह्वाल्दिमीर व्हेलचा मृत्यू

युद्धादरम्यान हेरगिरी करण्यासाठी प्राण्यांचा, पक्ष्यांचा वापर केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. आजदेखील अशा प्रकारचे संशयास्पद प्राणी, पक्षी आढळून येतात. कधीकधी तर याच मुद्द्यावरून दोन देशांत वादही होतात. भारतानेही या वर्षी जानेवारीत एका कबुतराची सुटका केली आहे. हे कबुतर आठ महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात होते. 

हेरगिरीसाठी पशुपक्ष्यांचाही वापर करणे ही काही नवलाईची बाब नाही. एका पांढऱ्या बेलुगा व्हेल माशालाही असेच रशियाचा ‘गुप्तहेर’ मानले जात होते. या व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. 

एका वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार, ३१ ऑगस्ट रोजी मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना नॉर्वेतील रिसाविका खाडीत या व्हेलचा मृतदेह तरंगताना आढळला. १,२२५ किलो वजनाच्या १४ फूल लांब या व्हेलचे वय सुमारे १५ वर्षे होते. क्रेनच्या साह्याने त्याचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला. त्या गुप्तहेर व्हेलच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. समुद्रात त्या व्हेलला मोठ्या बोटीची धडक बसून त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्या व्हेलच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

ह्वाल्दिमीर व्हेलची २०१९ मध्ये प्रथमच माहिती जगाला मिळाली होती. हा व्हेल रशियापासून ४१५ किलोमीटर अंतरावर नॉर्वेमधील इंगोया बेटाच्या किनाऱ्यावर नजरेस पडला होता. या भागात बेलुगा व्हेल सहसा आढळत नाही, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. या व्हेलच्या गळ्याभोवती एक पट्टा दिसून आला. त्याची जवळून पाहणी केली असता त्याच्या शरीरावर रशियन शहर सेंट पीटर्सबर्ग असे नाव लिहिलेले होते. त्याच्या शरीरावर कॅमेऱ्यांसह मशीन्स देखील बसविण्यात आल्या होत्या. रशियन नौदल व्हेलला प्रशिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. यामुळेच तो रशियाचा गुप्तहेर व्हेल मानला जाऊ लागला.

पाश्चात्य माध्यमांमध्ये ह्वाल्दिमीरबद्दल दावा करण्यात आला होता की प्राण्यांना हेर बनवण्याच्या रशियन प्रकल्पाचा तो एक भाग होता. मात्र, रशियाने हे अमान्य केले. त्यानंतर व्हेल आणि रशियन राष्ट्राध्यक्षांची नावे एकत्र करून, सोशल मीडियावर त्याला ह्वाल्दिमीर स्पाय व्हेल म्हटले जाऊ लागले. बेलुगा व्हेल सामान्यतः थंड आर्क्टिक महासागरात राहतात. पण हा व्लादिमीर माणसांमध्ये सहज राहत असे. माणसांसोबत डॉल्फिनसारखा तो व्हेल खेळायचा.

ह्वाल्दिमीरने मानवी बंदिवासात बराच वेळ घालवला असावा, म्हणून त्याला मानवांसोबत राहण्याची सवय झाली आहे, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

ह्वाल्दिमीरचे संरक्षण करणाऱ्या नॉर्वेजियन एनजीओ मरीन माईंडने सांगितले की, या व्हेलला गेल्या काही वर्षांत अनेक किनारी भागात पाहिले गेले आहे. खूप शांत स्वभावाचा व्हेल होता हे लवकरच आमच्या लक्षात आले. त्याने हाताने केलेल्या संकेतांवरही प्रतिक्रिया दिली होती. एनजीओने सांगितले की, ह्वाल्दिमीरला लोकांशी खेळायला आवडते. नॉर्वेतील हजारो लोकांचे त्याच्यावर प्रेम होते. ह्वाल्दिमीरचा मृत्यू हृदयद्रावक आहे.


- गणेशप्रसाद गोगटे, गोवन वार्ता