आज आपण एका अशा कालखंडात वावरत आहोत, जिथे साता समुद्रापलिकडील भाषा अगदी आपल्या हातातील यंत्रामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. एका क्लिकवर जगातील भाषांचा इतिहास, संस्कृती, त्यांचे महत्त्व आपण जाणून घेऊ शकतो. अनेक भाषांचा अभ्यास करून स्वतःला वैचारिक, सांस्कृतिक, साहित्यिक दृष्ट्या समृद्ध करू शकतो. या पार्श्वभूमीवर मराठी-कोंकणी वाद परत एकदा उकरून काढणे आणि तोही कोण्या एका साध्यासुध्या व्यक्तीने नाही, तर विचारांची भरभक्कम बैठक असलेल्या सर्वोच्च पुरस्कार प्राप्त लेखकाने? हे खरेच दुर्दैवी आहे.
भाषा माणसांना जोडण्याचे काम करते. ती भौगोलिक सीमा पार करीत प्रवाहित होते. ती अंतःकरणपूर्वक येते. संस्कार देते, संस्कृतीची देवाणघेवाण करते. व्यक्तिमत्त्व विकसित करते. नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही आपल्या राज्याने केलेली आहे. त्यात भारतीय भाषांना प्राधान्यक्रम आहे. त्या त्या राज्यातील भाषांना महत्त्वाचे स्थान या नवीन शैक्षणिक धोरणात अग्रक्रमाने आहेत. मराठी भाषिक विद्यार्थ्याने जर अभ्यासक्रमात कोंकणी विषय घेतला आणि त्या मुलाला जर भाषिक अडचण निर्माण झाली, तर कोंकणी विषय मराठीतून समजावून सांगण्याची तरतूद शैक्षणिक संस्थांनी करायला हवी, हे आज भाषा धोरण सांगते. हे सर्व भारतीय भाषांसाठी आहे. मुलांना आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती कळावी, ती तशी स्पष्टपणे कळत जाते ती स्वतःच्या भाषेतून. आपल्याला कार्यशाळा घेण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मराठी साहित्यिक चालतात, नावाजलेले अभिनेते चालतात. मग गोव्यातील मराठी भाषा, जी या प्रदेशाची अस्मिता आहे, ती गोव्याचीच असल्याचे सारे पुरावे असतानाही एवढा आकस का?
निस्सीम भाषाप्रेमी कोणत्याही भाषेचा कधीच दुस्वास करणार नाहीत. भाषा हे अभिव्यक्तीचे केंद्र आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. ते हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. तिला राजाश्रय लाभला तर तिचा दिमाख वाढतो हे जरी असले, तरीही ती लोकांश्रयावर युगानुयुगे प्रवाहित राहते. वयाने जेवढे वाढत जातो तेवढे अनुभव वाढतात, वैचारिक प्रगल्भता येते. आपली जबाबदारी आहे येऊ घातलेल्या पिढीच्या मनात भाषाविषयी दुस्वास पेरण्याची कृती करताना अनुभवी व्यक्तिमत्त्वांनी विचार करून वागण्याची! अशाने आपण भाषांना नाही, तर संस्कृतीला संपविण्याचा प्रयत्न करत असतो, वैयक्तिक नात्यात किल्मिष निर्माण करतो, व्यक्तींच्या विचारांची वाढ थांबवतो, बहूभाषेमधून वाचन लेखन संवाद साधण्याच्या कृतीवरच घाला घालतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. हे ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी परस्परांच्या भाषांचा द्वेष न करता प्रेमच करायला शिकवायला हवे. ही आजची गरज आहे.
गोमंतकाची मराठी भाषा उपरी नाहीच. ती या मातीतली. जीची मुळं आत आत, खोलपर्यंत गेलेली आहेत. ती हलणारही नाही, गळणारही नाही. उंच उंच वाढत जाणार. माझ्या दैनंदिन जीवन व्यवहारातील कोकणीने मला भावनिक जिव्हाळा दिला, आत्मियता दिली; तर मराठीने सर्जकता, संस्काराची अभिजात शिदोरी बहाल केली. माझे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी या भाषांनी केलेले उपकार विस्मरणात जाणार नाहीत. मात्र मराठीचा द्वेष करताना कोकणीचा विकास खुंटणार नाही ना? याचा विचार जरूर व्हावा!
या भाषेला संतांच्या वाणीचा स्पर्श झालेला आहे. कृष्णदास शामा, कृष्णमभट बांदकर, संत सोहिरोबानाथ आंबिये यांची आध्यात्मिक परंपरा मनिमानसी भिनलेली आहे. ती वरवरची नाही. बा. भ. बोरकर, शंकर रामाणी यांनी तर कोकणीच्या गोडव्याची चटक लावली. मूळ गोमंतकीयांच्या घराघरात बोलल्या जाणाऱ्या या भाषेतून व्यक्त होत भाषेचे वेगळेपण सिद्ध केले. नवी पिढी भाषेच्या बंधनात अडकू पहात नाही. तिला भावते ती तिची भाषा या पिढीत मराठी कोकणीची गोडी निर्माण करायचे सोडून त्यांच्यात मत्सराची बिजेच पेरत राहिलो, तर त्याचा विपरीत परिणाम होण्याचीच चिन्हे अधिक आहेत. मराठीला राज्यभाषेच्या कायद्यातून वगळा या विधानाने काय साधले? भाषिक तेढ निर्माण झाली, मैत्रीत कटुता वाढली, नातेसंबंध ताणले, आरोप प्रत्यारोप झडले यातून मराठीचे अढळपद ढळणार का? अजिबात नाही!
भाषाप्रेमी कधीच दुसऱ्या कोणत्याही भाषेचा तिरस्कार करणार नाहीत. ज्या भाषेने वैचारिकता बहाल केली, कोंकणी लेखनाला बळकटी दिली त्या भाषेला तर कधीच दूषणे देणार नाहीत. विनाकारण उकरून काढलेल्या भाषिक वादात आम्ही नव्या पिढीसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहोत याचे भान जरूर बाळगावे. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय भाषांना महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलेले आहे. ते मुळातून वाचणेही गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शैक्षणिक स्तरावर भाषा शिक्षणात एक नवे मन्वंतर येत असताना आपण त्याच जुन्या बुरसटलेल्या द्वेषाच्या तिरस्काराच्या मानसिकतेलाच पोसणार आहोत का?
कोंकणी कशी विकसित करायची, मनामनात तिला कसे स्थान मिळवून द्यायचे, तिची भाषिक समृद्धी, शब्दसंपदा कशी वाढवायची, तिच्यातून अभिजात साहित्यकृती कशा निर्माण करायच्या यावर विचारमंथन न करता जर मराठीचा द्वेष करण्यातच वेळ खर्ची घातला, तर तिचे होणारे नुकसान कोणीही टाळू शकत नाही.
पौर्णिमा केरकर