आलिशा गडेकर-नाईक

भलेही तरुणाईच्या अभिव्यक्तीच्या वाटा वेगवेगळ्या असतील परंतु ही तरुणाई काहीतरी करू पाहते, सांगू पाहते, लिहू पाहते हे सत्य आहे!

Story: प्रेरक सर्जक |
12th January, 03:33 am
आलिशा गडेकर-नाईक

‘माझ्या आयुष्यात लिखाण हे खरंच ईश्वरी देणगी आहे. मी माझ्या लिखाणाचे श्रेय सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना देते. कारण ज्या वेळी मी एखादा निबंध लिहायचे, त्यावेळी माझे आई-बाबा तो निबंध मोठ्याने वाचायचे आणि त्यावर बाबा मला प्रतिक्रिया द्यायचे. त्यांनी दिलेल्या शाबासकीने मला आणखी लेखन करण्याचे प्रोत्साहन मिळायचे. लिखाणाची सुरुवात शाळेत असताना झाली. निबंध लेखन करायला मला खूप आवडायचे, विविध कवींच्या कविता वाचन-गायन करायची आवड जडली. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच आदरणीय शिक्षिका मंदा भंडारकर यांनी सुसंस्कार घडवून मराठी भाषेचा पाया मजबूत केला. भाषेवर प्रेम जडलं आणि छोटे मोठे निबंध लिहायला सुरुवात केली. स्पर्धेला जाऊ लागले, शिक्षकांची शाबासकी मिळू लागली आणखी प्रोत्साहन मिळत गेलं. भावूक असल्यामुळे स्वतःचे व इतरांचे सुख दुःखाचे प्रसंग अनुभवून मनात असलेल्या भावना, विचारांच्या घरट्याचे स्वरूप नकळत लिखाणात उमटू लागले. हे लिखाण शिक्षक वर्गात वाचून दाखवू लागले. शिक्षकांचे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत गेले.’ स्वतःच्या लेखनविषयक आवडीविषयी युवा लेखिका, कवयित्री, गायिका आलिशा गडेकर या आपलं मन भरभरून मोकळं करीत होत्या. 

खरंतर अलिशा गडेकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लिखाणाला पोषक होती असे अजिबात नाही. गरिबीचे चटके सोसतच त्यांचे बालपण सरले. ‘येरे दिसा भर रे पोटा’ अशाच परिस्थितीत आईवडील आणि चार बहिणी अशा परिवारात त्या वाढल्या. बालपणी चार बहिणींसोबतचा कालखंड तर अतिशय निरागस होता. याच काळात आलिशा यांचे बालपण रम्य बनले. त्या विषयी त्या सांगतात... लिखाण, चित्रकला, गायन, नृत्य, रांगोळी, फुलांचे गुच्छ करणे, सर्जनशीलता असणारे कार्य, विविध क्रीडा क्षेत्रात भाग घेत बालपण गेलं. सुट्टीत वर्तमानपत्रात आलेले विविध सुविचार, बोधकथा, प्रसिद्ध कवींच्या कविता गोळा करणे, वाचन करणे, शिबिरात सहभागी होऊन कलाकौशल्ये आत्मसात करून, अभिनयाची आवड जतन करायला लागल्या. अजूनही ही कला त्या जोपासत आहेत. छोट्याछोट्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करीत, आर्थिक हातभारासाठी ट्युशन वर्ग घेत स्वत:च्या शिक्षणाचा खर्च, तसेच वडिलांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांना आधार मिळावा म्हणूनही त्या कार्यरत राहिल्या. घरात लेखन वाचनाची कोणतीही खुण नसतानाच अलिशामध्ये लहान वयापासूनच लेखन वाचनाची आवड निर्माण होणे हे कौतुकास्पद वाटते. हाताशी आलेले कोणतेही वर्तमानपत्र, बाजारातून भाज्या व इतर सामान गुंडाळून आणलेले कागद घेऊन वाचन करायला बसणे तिला आवडायचे. अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवित तिच्या रम्य अशा बालपणाचे दिवस कधीचेच सरून गेले. कुमारवयीन वय हे काहीसे नवथर, हळव्या वाटा वळणातून प्रवास करते. याच वयाला योग्य वळण लागले तर त्यातील सकारात्मक ऊर्जा कौशल्याने सामोरी येते. अलिशा यांच्या सुदैवाने त्यांना तसे आदर्श शिक्षक आणि सल्लागार लाभले. त्या स्वतःच सांगतात, “आदर्श शिक्षक हा एक सल्लागार व उत्तम मार्गदर्शक असतो. जो आपल्या शिष्याला घडवत असतो. आपल्या शिष्यावर ज्ञानाचं पाणी ओतून त्याला समृद्ध करत असतो. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण म्हणजे मला माझ्या गुरुंची झालेली भेट! माझे गुरू आदरणीय श्री.अनिल सामंत सर. त्यांचे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व अन् पाठ तसेच खास करून कविता शिकवण्याच्या पद्धतीने मला स्वरचित कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळत गेले. जसं म्हणतात ना की चंदनाच्या सानिध्यात कोणतीही साधारण वनस्पती चंदनाचा सुगंध प्राप्त करू शकते. माझ्या बाबतीतही तसंच घडलं. सामंत सरांच्या प्रत्येक शब्दांनी माझ्या मनातील भावनिक शब्दांना अंकुर फुटत गेला आणि त्या अंकुराला एक एक पालवी उमटू लागली. हळूहळू हे लिखाण वर्तमानपत्रात प्रकाशित होऊ लागलं. प्रत्येक टप्प्यावर असे मार्गदर्शक भेटून गेले. मी विकसित होत गेले. शालेय ते महाविद्यालयीन पुढे पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी आपली चमक दाखविली.

विविध वर्तमानपत्रातून, तसेच अनेक साहित्यिक उपक्रमात सातत्याने सहभाग दर्शवला. विविध वर्तमानपत्रातून त्या सातत्याने लिखाण करतात. ‘अवनिष’नियतकालिकामध्ये तसेच वेगवेगळ्या मासिकांमधून कविता, लेख प्रसिद्ध झालेले असून मराठी, कोंकणी, हिंदी भाषेतून गीते लिहून गीतांना चाली लावून त्यांचे अभिनयासह सादरीकरणही केलेले आहे. त्यांच्या या लेखन व इतर कला कौशल्याची दखल विविध पातळ्यांवर घेतलेली आहे.

उत्कृष्ट कवयित्री म्हणून महाराष्ट्र राज्य स्तरीय सन्मान प्राप्त झाला आहे. लेखिका म्हणून त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव धारगळ पेडणे या त्यांच्या जन्मगावी खास गौरव केलेला आहे. गोवा मराठी अकादमीतर्फे मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गांधर्व महाविद्यालयाची गायनाची प्रथम परीक्षा, यूट्यूब चॅनलवरचा अभिनय, ‘अवघी दुमदुमली पंढरी’, ‘यशोदेला पुत्र झाला’ या वेगवेगळ्या अल्बममध्ये संत जनाबाई, संत नामदेव, यशोदा, देवकी यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्नही आलिशा यांनी केलेला आहे.

सध्या त्या  केशव स्मृती बालविकास, सांकवाळ येथे शिकवितात. शापोरा नदीच्या काठी वसलेल्या धारगळ गावात जन्म. वडिलांनी गवंडी काम करून चारही मुलींना वाढविले. शिक्षणासाठी प्रवृत्त केले. वडिलांकडून संघर्ष तर आईकडून दातृत्व, गरिबीतही आनंदाने, सचोटीने जगता येते याचा आदर्श घातला. मला आवड असलेल्या प्रत्येक क्षेत्रात मला पाठिंबा देणारा, प्रोत्साहन देणारा, आणखी दर्जेदार लिखाण कर असे म्हणून वाढदिवसाला एखादे पुस्तक भेट म्हणून देणारा संगीतप्रेमी असलेल्या माझ्या नवऱ्याची संतोष नाईक यांची प्रेरणा ही तर माझ्या साहित्यिक ओळखीची महत्त्वाची खुण आहे असे अलिशा अभिमानाने सांगते. ती शब्दात, तर तो स्वरांत आनंद शोधतो. शब्द स्वरांची गुंफण जगण्यात चांदणे निर्माण करते. तिनं केलेल्या कवितांना तो आवाज देतो. माहेराएवढेच सासरीसुध्दा माझ्या कलेचे कौतुक होते असे अलिशा म्हणते. कविता लिहिणे, त्या गुणगुणत त्यावर अभिनय करणे तिला आवडते. ‘आईच्या गर्भात’ हे कवितेचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

धारगळ हे तिचे माहेर. या गावाने तिला आपुलकीने, एकजुटीने, अभिमानाने, आदराने जगायला शिकविले. साधेपणात सौंदर्य अन् सर्वात महत्त्वाचे हाती लेखणी हा धडा मला माझ्या गावाने दिला. एकंदरीत, ‘मुंगी होऊन साखर खावी’ हा उपदेश या गावातून प्राप्त झाला असे त्या मानतात. तरुण मने वाचत नाहीत, लिहीत नाहीत, ती भरकटत चालली आहेत असे सतत ऐकू येते. परंतु अलिशा-संतोष सारखे सहजीवन ही एक अशा विचारांना सकारात्मक ऊर्जा देते. भलेही तरुणाईच्या अभिव्यक्तीच्या वाटा वेगवेगळ्या असतील परंतु ही तरुणाई काहीतरी करू पाहते, सांगू पाहते, लिहू पाहते हे सत्य आहे!


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)