लहान-थोरांना आपल्या रंग, पंख आणि विविध प्रकारांनी नेहमीच आकर्षित करणाऱ्या पक्ष्यांचा दिवस आपण नुकताच साजरा केला. त्यानिमित्ताने हा लेख.
लहानपणात जवळजवळ सर्वांनाच पक्ष्यांसारखी उंच आकाशात उडण्याची इच्छा झाली असेल. पक्ष्यांप्रमाणे आपणही स्वच्छंदी विहार करावा, त्यांच्यासारख्याच घिरट्या घालाव्यात असे कधी न कधी नक्कीच वाटले असेल. पक्षीच का उडू शकतात? आपण का नाही? आपण पक्षी झालो असतो तर किती बरं झालं असतं? यासारखे कित्येक प्रश्नही पडले असतील.
औद्योगिकरण, जंगलांची कत्तल, प्रदूषण व अधिवास नष्ट केल्याने पक्ष्यांची प्रजाती संकटाच्या भोवऱ्यात सापडत आहे. शहरी भागातील कित्येक ठिकाणी, जसे राजधानी पणजीतील आरोग्य उपकेंद्राच्या मागे, दिवसाढवळ्या कितीतरी पक्षी मृत्युमुखी पडलेले दिसून येतात. यामागचे अचूक कारण शोधून काढणे हा जरी संशोधनाचा विषय असला तरी पक्ष्यांच्या मृत्युमुखी पडण्यामागे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उपद्रवी माणसाचाच हात आहे हे सांगण्यास कुठल्याच ज्योतिषशास्त्राची गरज नाही. या अनुषंगाने, लोकजागृती निर्माण करण्यासाठी, दरवर्षी ५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ पक्ष्यांचा उत्सव म्हणून साजरा केला जात नसून पक्ष्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी माणसाला एकत्रितपणे झटण्याचा आहे.
पक्ष्यांच्या शरीराची रचना विशिष्टप्रकारची असते. शरीराला जोडून असलेले पंख मध्यभागी उंचावलेले, तर कडेला सपाट असतात. या अशा रचनेमुळे, पंखांच्या मध्य आणि कडेच्या भागात प्रवाहित होणाऱ्या हवेच्या दाबात फरक निर्माण होऊन पक्ष्यांना आकाशात उंच उडणे शक्य होते.
शरीराचं वजन पेलून उडता यावं म्हणून त्यांची मात्र पोकळ बनवलेली असतात. पोकळ हाडांमुळे पक्ष्यांमध्ये उडण्याची क्षमता निर्माण होते. पण हाडं जरी पोकळ असली, तरी त्यांचे स्नायू खूप मजबूत असतात. उड्डाण करण्यासाठी पक्ष्यांना प्राणवायूची निरंतर गरज असते. म्हणूनच ते द्विचक्रिय श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे अनुसरण करत असतात. संपूर्ण शरीराला प्राणवायूचा अविरत पुरवठा व्हावा म्हणून त्यांच्या फुफ्फुसांची रचनाही तेवढ्याच विशिष्ट पद्धतीने केलेली असते.
बियाणांचा प्रसार व परागण या पक्ष्यांच्या इकोसिस्टमधील दोन प्रमुख भूमिका. वड, पिंपळ यासारखी झाडे तर बियाणांच्या प्रसारासाठी पूर्णत: पक्ष्यांवर अवलंबून असतात. मेलेल्या प्राण्यांचे वेगाने विघटन करण्याचे कार्यही पक्षीच करतात. त्यामुळे पक्षी हा निसर्गातील अविभाज्य घटक मानला जातो. एखाद्या प्रदेशात पक्ष्यांची कमी किंवा जास्त झालेली संख्या त्या प्रदेशाचे आरोग्य दर्शवते. निरोगी इकोसिस्टम म्हणजे ती इकोसिस्टम ज्यामध्ये वन्यजीव (प्राणी-पक्षी-कीटक) गुण्यागोविंदाने नांदतात.
हिवाळ्यात होणारे पक्ष्यांचे स्थलांतरही बियाणे विखुरण्याच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. स्थलांतर करणारे पक्षी आपल्या मार्गात बियाणे विखुरण्याचे काम करतात. त्यामुळे विविध ठिकाणाची जैवविविधता टिकायला मदत होते. बदके, माशांची अंडी एका पाणथळ प्रदेशातून दुसऱ्या पाणथळ प्रदेशात वाहून नेऊ शकतात. तसेच, नायट्रोजनने समृद्ध असलेली पक्ष्यांची विष्ठा उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरात आणली जाऊ शकते.
आपल्यापैकी कित्येक जणांना पक्ष्यांना दाणे किंवा बाहेरचे खाण खायला घालायची सवय असते. ही खरतरं खूप चुकीची सवय आहे. या सवयीमुळे आपण पर्यावरणीय नियमांचे उल्लंघनच करत नाही तर अन्नसाखळीचे संतुलनही बिघडवतो. एखाद्या प्रदेशात एकाच प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या वाढणे ही सुद्धा चिंतेची बाब असते. खायला घातल्याने परिसरात एकाच प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या वाढण्याचा धोका असतो. आयती खावड मिळत असल्यामुळे एका प्रजातीचे पक्षी दुसऱ्या प्रजातीच्या पक्ष्यांना त्या परिसरात प्रवेश करू देत नाही. यामुळे परिसरातील विविधता नष्ट होते.
आपल्याला पक्ष्यांसारखं उंच आकाशात उडता जरी येत नसलं तरी उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून आपण आनंदी नक्कीच होतो. हा आनंद टिकवून ठेवण्यासाठी निसर्गात विविध प्रजातींचे पक्षी टिकवून ठेवणे गरजेचे आहे. सुंदर, रंगीबेरंगी, मोहक अशा या जीवांबद्दल एखाद्याला आपुलकी वाटत नसेल तर ते नवलच! या अशा उडणाऱ्या वन्यजीवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी योग्य पावले उचलणे अनिवार्य आहे.
वाट्टेल तिथं कचरा फेकणे, झाडे तोडून बागेत लाॅन लावणे, पक्षांना बाहेरचे खाद्यपदार्थ खायला घालणे, स्वतःच्या मनोरंजनासाठी नेम धरून पक्ष्यांवर दगड मारणे यासारखे उपद्व्याप आपण तर करत नाही आहोत ना? याचे आत्मनिरीक्षण करावे. पक्षी संरक्षण आणि संवर्धनाविषयी जमेल तितकी माहिती गोळा करुन ती इतरांपर्यंत पोहोचवावी. पक्ष्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकजागृती करणे,
कार्यशाळा घेणे, पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी पूरक जागा व वातावरण निर्माण करुन देणे यासारखे लहान लहान उपक्रम हातात घेतल्यास पुढच्या वर्षी पक्षी दिवस येईपर्यंत पक्ष्यांना होणारा त्रास नक्कीच कमी झालेला असेल.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या
प्राध्यापिका आहेत.)