हे म्हातारचळ की..?


01st September, 12:00 am
हे म्हातारचळ की..?

दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ जाहिर झाले, तेव्हा आम्ही काही मराठी लेखक त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो हे चुकले की काय आमचे? असे वाटण्याजोगी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे. मावजो साहेब, आमच्या मनात तुमच्याबद्दल किंवा कोंकणीबद्दल आकस असता तर आम्ही कशाला आलो असतो? आमची भावना शुद्ध होती म्हणून आलो. आम्हीच काय? डाॅ. अनुजा जोशी म्हणतात त्याप्रमाणे आमची अनेकांची तुमच्या बद्दलची भावना आपुलकीची होती. एक साहित्यिक म्हणून अभिमानाची होती. पण आपल्या विकारी वक्तव्याने त्या भावनेला आपण चूड लावलीत. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक इतक्या कोत्या बुद्धीचा असावा याचे आश्चर्य वाटते. काही जण म्हणतात, हे म्हातारचळ असावे. मला नाही वाटत हे म्हातारचळ असावे. ही विचार करून केलेली कृती आहे. यामागे षड्यंत्र निश्चित आहे.

मावजो म्हणतात, राजभाषा कायद्यातून मराठी वगळा. का? मराठी बाहेरची आहे असे वाटते का तुम्हाला? तुम्ही हो म्हणत असाल तर मात्र तुमच्या बुद्धीची कीव करावी लागेल. कारण? परेश प्रभू म्हणतात, २७ जून १६८४ रोजी व्हाईसराॅयच्या नावे एक हुकूम काढून म्हटले, स्थानिकांनी मराठी ऐवजी केवळ पोर्तुगीज भाषाच शिकली पाहिजे. त्यांनी असे म्हटले नाही, कोंकणी ऐवजी पोर्तुगीज भाषाच शिकली पाहिजे. याचा अर्थ येतोय ना लक्षात?

१७६५ मध्ये इथल्या पाद्र्यांनी सरकारला पत्र लिहिले. त्यात गोव्याची मातृभाषा मराठी असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. यापेक्षा आणखी मोठा पुरावा हवा? पोर्तुगीज येण्याआधीचे इथले जे ताम्रपट सापडले (म्हणजे सहाव्या, सातव्या शतकातील ताम्रपट) ते संस्कृत आणि मराठी भाषेत आहेत. इ.स. १३०० मधील खांडोळे येथील ताम्रपट याचे ढळढळीत पुरावे आहेत.

पोर्तुगीजांनी आपले सगळे ग्रंथ, सगळ्या पोथ्या जाळून टाकल्या. पण कृष्णदास शामा यांनी १५२६ मध्ये लिहिलेली ‘श्रीकृष्णचरित्रकथा’ या तडाख्यातून वाचली. शांतादुर्गेने हा राखून ठेवलेला आमच्यासाठी प्रसाद आहे. कृष्णदास शामाने १५२६ साली भागवतांच्या ‘दशमस्कंदा’वर टीका लिहिताना म्हटले,

‘दशमस्कंदीचा सांगेन वृत्तांत | 

मराठीया||’

पोर्तुगीजांनी आपल्या पाशवी शक्तीचा वापर करून गोव्यातील अनेकांना बाटवले. ख्रिश्चन केले. त्यांनी फादरना विनंती केली, ‘तुम्ही आम्हाला ख्रिस्ताचे चरित्र, ख्रिस्ताच्या गोष्टी वाचा म्हणता. आम्हाला पोर्तुगीज भाषा येत नाही आम्ही कसे वाचू? आम्ही वाचले पाहिजे, तर आमच्या भाषेत आम्हाला द्या. मग आम्ही वाचतो.’ त्यावेळी फादर स्टीफनने १०,९६२ ओव्यांचे ‘ख्रिस्तपुराण’ मराठीतून लिहिले. मराठी द्वेष्ट्यांनो लक्षात घ्या! ‘ख्रिस्तपुराण’ मराठीतून लिहिले, कोकणीतून नव्हे. फादर स्टीफन म्हणाले,

‘जैसी हरिळांमाजी रत्नकिळा

की रत्नांमाजी हिरा निळा |

तैसी भासांमाजी चोखळा

भासा मराठी ||’

त्याकाळी गोव्याची व्यवहाराची भाषा मराठी, सामाजिक धार्मिकतेची भाषा मराठी, ग्रंथांची भाषा मराठी, ताम्रपट, शिलालेखांची भाषा मराठी. एक आमदार म्हणाले, “खंयची मराठी?” हे सगळे पुरावे जर तुम्ही वाचला असता, तर खंयची मराठी म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. तुम्ही काही वाचत नाही, ज्ञान मिळवत नाही, फक्त ज्ञानपीठ पुरस्कार तेवढे घेता आणि काहीही बरळता. आज मी कोंकणी वाचतो, लिहितो त्याला कारण मराठी. मी जर पोर्तुगीज आणि इंग्रजी शिकलो असतो तर कोंकणी वाचू लिहू शकलो असतो का? याचाही विचार करा. 

तुमच्यामागे सत्ता आणि संपत्तीची शक्ती आहे. म्हणून काहीही बरळू नका. कारण यामुळे तुम्ही कोकणी-मराठी प्रेमींमध्ये जी आपुलकी आहे, नितळ मैत्री आहे आणि आपलेपणाचे संबंध आहेत ते संपवू पाहाता आहात. तुमची मुक्ताफळे वाचून मराठी प्रेमी गप्प बसतील असे वाटते तुम्हाला?


चंद्रकांत महादेव गावस