मुलांच्या आवडत्या बाई अमिता सांबारी

स्वतःच्या मुलाच्या जाण्याचा आघात सहन करताना त्यांनी ‘शिशु विकास’ शाळेतील मुलांमध्ये आपले मन रमवताना त्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा आपले मूल आहे, ही भावना त्यांनी मनात ठेवली आणि प्रत्येक मुलाला त्यांनी आईची माया देतानाच त्यांच्यावर चांगले संस्कारही घडवले.

Story: तू चाल पुढं |
31st August 2024, 04:06 am
मुलांच्या आवडत्या बाई अमिता सांबारी

मडगाव येथील समाज सेवा संघाच्या शिशु भारती शाळेच्या मुख्याध्यापिका अमिता सांबारी या शाळेतील मुलांना शिक्षणासोबतच सुसंस्कार, श्लोक, प्रार्थना पाठ करून घेताना त्यांच्यावर जीवन मूल्येही रुजवतात. बी.ए. ची पदवी घेतलेल्या अमिता सांबारी या मोंटेसरी प्रशिक्षित आहेत. पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवण्याचा त्यांना २६ वर्षांचा गाढा अनुभव आहे. त्यांच्या मायेच्या छत्राखाली शिक्षण आणि सामाजिक मूल्यांचे शिक्षण घेऊन आज कित्येक मुले विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहेत. लहान असताना अमिता बाईंनी मनावर ठसवलेले संस्कार त्यांच्यावर इतके आहेत, की त्यांचा विद्यार्थी त्यांना कुठेही भेटला तरी ‘अमिता बाई...’ अशी हाक मारून त्यांच्या पायाला नमस्कार करायला विसरत नाही. आणि हेच आपल्या संस्काराचे फळ आहे असे अमिता बाई मानतात. आज जरी त्या अमिता सांबारी असल्या तरी मडगावतील कित्येक मुलांच्या त्या फक्त लाडक्या अमिता बाई आहेत.


२००८ साली अमिता बाईंच्या संसार वेलीवर पुष्प उमलले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अवघ्या एका वर्षाने म्हणजेच २००९ साली मे महिन्यात या लहानग्या मुलाचा घरातच अपघाती मृत्यू झाला. काळाचा हा घाला सोसणे अमिता यांना फार कठीण होते. कारण याच दिवशी २००२ साली त्यांच्या भावाचा ही अपघाती मृत्यू झाला होता आणि नेमक्या त्याच दिवशी त्यांच्या मुलाला काळाने हिरावून नेले. मनावर झालेला हा प्रचंड आघात सहन करताना त्यांनी काळजावर दगड ठेवला आणि शिशु विकास शाळेतील मुलांमध्ये आपले मन रमवताना त्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा आपले मूल आहे, ही भावना त्यांनी मनात ठेवली आणि प्रत्येक मुलाला त्यांनी आईची माया देतानाच त्यांच्यावर चांगले संस्कार घडवताना प्रत्येकाला आपल्या मायेची पाखर घातली. शाळेत गेल्यावर तात्पुरते का होईना, त्यांच्या मनावरचे दु:खाचे ओझे शाळेतील मुलांच्या सोबतीत राहताना कमी व्हायचे. त्यांच्या या निस्सीम प्रेमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या त्या प्रेमळ अमिता बाई बनून गेल्या. काही मुलांना तर त्यांनी इतकी माया लावली होती, की काही मुले शाळा सुटल्यावरही आपल्या पालकांसोबत घरी जाण्यास तयार नसायची. अमिता यांचे घर शाळेपासून अगदी जवळ असल्याने काही मुले तर शाळा सुटल्यावर अमिता बाईंच्या घरी जात असत. त्यांच्यासोबत वेळ घालवताना अमिता बाईही आपले दु:ख काही क्षणाकरता विसरत असत. या काळात त्यांना शाळेने त्यांच्या शाळेतील सहकार्‍यांनीही  मोलाची साथ दिली.

अमिता बाई शाळेत खास आजी आजोबा दिवस साजरा करतात. हा खास दिवस साजरा करताना आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे करताना जे कष्ट काढले, ते मुलांच्या मनावर बिंबवताना आपल्या आई वडिलांना वृद्धापकाळात वृद्धाश्रमात ठेवू नये, हा मौलिक विचार त्यांच्या मनावर रुजवतात. भाऊबीज, रक्षाबंधन, नागपंचमी, गणेश चतुर्थी, दहीकाला आदी आपले सण शाळेत साजरे करताना त्याची माहिती प्रत्येक मुलांच्या मनावर बिंबवतात. तर प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन याच बरोबर शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद, श्रीराम आदी महापुरुषांच्या जयंती साजरी करताना त्या प्रत्येक मुलाला त्या त्या वेशभूषेत सादर करून त्यांच्याकडून देशभक्ती विषयक संवाद म्हणवून घेतात. प्रत्येक सण साजरे करताना मुलांसोबत त्याही हौसेने त्यांच्याबरोबर गाण्यात, नृत्यात सामील होतात. आपल्या बाई आपल्या सोबत प्रत्येक कृतीत सामील होत आहेत, हे पाहून लहान मुलांनाही आनंद होतो आणि मग प्रत्येक गोष्ट ही मुले समरसून करतात. शिशु विकास शाळेच्या प्रांगणातील सुवासिक फुलांसोबत मुलांना प्रेम देताना अमिता सांबारी या अनेक मुलांच्या आवडत्या प्रेमळ अशा अमिता बाई म्हणूनच मनात कायम आहेत.


कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव