आम्हा स्त्रियांच्या साज शृंगारात महत्त्वाचं अंग म्हणजे मेंदी. तिच्याशिवाय सोळा शृंगार पूर्णत्वाला येत नाही. अगदी प्राचीन काळापासून स्त्रिया मेंदीचा वापर करत आल्या आहेत. सणासुदीला मेंदी लावणं हा एक शुभ शकुनाचा विधी मानला गेला आहे. निसर्गाशी आपलं नातं हे कायम जोडलं गेलं आहे. मेंदी ही निसर्गाचीच एक देण आहे. कुठलाही आनंददायी सोहळा हा रंगाशिवाय सुना आहे. मग तिथे मेंदी लावणं आलंच. मेंदीने हात रंगल्याशिवाय श्रावणाची सुरुवात झाल्यासारखी वाटतच नाही.
आमच्या लहानपणी असे मेंदीचे तयार कोन मिळत नसत. मेंदीच्या झाडाची पाने काढून आणून, ती वाटून, मेंदीची पेस्ट बनवली जायची, वाटणारीचे हात अगोदरच लाल केशरी रंगून जायचे. नैसर्गिक मेंदीचा रंग हलका लाल केशरी असतो पण आजकाल त्या मेंदीत केमिकल वापरत असावेत, त्यामुळे ती पटकन रंगते आणि भडक लाल-मरून रंगात रंगते. तितकीच लवकर निघूनही जाते.
हल्ली विवाहाच्या वेळी नववधूला मेंदी लावण्याचा असा खास कार्यक्रमच ठेवला जातो. हॉल घेऊन नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी, मैत्रिणी सर्वांनाच या कार्यक्रमात बोलावलं जातं. त्या सर्वांच्या हातावर मेंदी रेखाटली जाते. त्यासाठी मेंदी काढणाऱ्या कुशल कलाकारांना बोलावले जाते. तळहातापासून ते अगदी कोपरापर्यन्त मेंदी काढली जाते. हातावरच नव्हे, तर पायावरही मेंदी रेखाटून त्याची शोभा वाढवली जाते. मग त्या रात्री सर्व स्त्रिया धमाल करतात. नाच, गाणी, खाणं-पिणं यातून आपली हौस भागवून घेतात. सण-उत्सव-समारंभ हे यासाठीच तर आयोजित केले जातात. जे आपल्या मनाला ताजेतवाने करून जातात. मेंदीचा रंग एकच तो म्हणजे लाल पण त्यातही खूप वेगवेगळी चित्रे, डिझाईन्स, नक्षी काढून त्याचे सौन्दर्य आणखीनच खुलवले जाते. पानाफुलांची अशी अरेबिक मेंदीची डिझाईन्स मनमोहक असतात. तर काही कुशल मेंदी कलाकार त्यातून नवरीच्या डोलीचे, राजा राणीचे चित्र, वरातीची मिरवणूक अश्या चित्रांची रेखाटने करतात. बारीक नक्षी, कलाकुसर, जाळीदार, चौकट अश्या अनेक स्वरूपात रंगलेली नक्षी आपले लक्ष वेधून घेत असते. एका हातावरची नक्षी दुसऱ्यासारखी नसते. प्रत्येकाचे खास वैशिष्ट्य असते. यावरून त्या मेंदी कलाकारांची कलात्मकता दिसून येते. नवरीच्या हातावरची मेंदी खास असते, कारण तिच्या मेंदीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाचे आद्याक्षर लपलेले असते आणि ते तिच्या जोडीदाराने शोधून दाखवायचे असते. म्हणूनच त्या दिवशी,
‘मेंदी तुझ्या नावाची, आज माझ्या हातावर लागणार
बारीक नक्षीने नाव त्यात तुझं मी लपवणार’ अशी प्रत्येक नववधू आपल्या मनाशी विचार करत रंगून जात असेल. ते शोधताना होणारा त्याच्या हाताचा स्पर्श म्हणजे प्रेमी युगुलाच्या मनात प्रेमभाव निर्माण करायची कृती असते याला कारण मात्र असते मेंदी. त्याच्यासाठी आपल्या सखीचा मेंदीने रंगलेला हात आणि त्याचा मंद सुवास हा कायमच पहिल्या रात्रीची आठवण करून देणारा, तर तिचा पहिला स्पर्श मेंदीच्या सुगंधासहित जोडीदाराच्या मनात कोरला जात असेल.
मेंदीच्या रंगातच नव्हे, तर तिच्या सुवासात पण एक ओढ असते. आपल्या श्वासात भरून घ्यावासा वाटतो तो सुगंध. सुंदरता वाढवणारी ही मेंदी सर्वच स्त्रियांना, मुलींना आवडीची असते. त्याशिवाय त्यांचं सजणं पूर्ण होत नाही. हात गोरा असो, सावळा, की काळा; मेंदी प्रत्येक हाताला सजवायचा प्रयत्न करते. ज्याच्या हातावरची मेंदी जास्त गडद रंगते, त्याच्यावर त्याच्या जोडीदाराचे जास्त प्रेम असते असे मानले जाते. निदान मुली एकमेकींना तसे चिडवताना दिसतात. नागपंचमी, मंगळागौर, सत्यनारायणाची पूजा प्रत्येक सण समारंभाला मेंदी काढायची पद्धत आहे. त्यामुळे आपल्या मनाला मंगलमय पावित्र्य आल्या सारखे वाटते. आपलाच हात आपल्याला सुंदर वाटू लागतो. पुन्हा पुन्हा त्या रंगलेल्या हातावरची नक्षी बघाविशी वाटते.
हल्ली मात्र मेंदी ही फक्त हात पायावरच लावण्यासाठी वापरली जात नाही, तर केसांच्या आरोग्यासाठी तिचा वापर केला जातो. पूर्वी सुद्धा काही स्त्रिया पांढऱ्या होत चाललेल्या केसांना रंगवण्यासाठी मेंदी वापरायच्या, पण त्याने केस ऑरेंज कलरचे होतात म्हणून आजकाल वेगवेगळे कलप मिळतात ते वापरले जातात. पण ज्यांना केमिकलची अलर्जी आहे त्यांना मेंदीचा नैसर्गिक पर्यायच उरतो. लहान मुलांना पूर्वी गोवर, कांजिण्या असे आजार झाले की मेंदीची पाने उकळून त्याच्या पाण्याने आंघोळ घातली जायची. मेंदी ही शरीराला थंडावा देणारी वनस्पती आहे. नैसर्गिक असल्याने त्याचे अपाय होत नाहीत. लग्न कार्याच्या वेळीही खूप सारी कामे, जबाबदाऱ्या, जागरणे, टेंशन यामुळे वाढलेली उष्णता कमी करण्याचे काम मेंदी करते.
मेंदीचे झाड म्हणजे झुडुप असते. त्याच्या फुलांचे अत्तर बनवतात. आपल्या संस्कृतीत देवदेवतांच्या मूर्तीच्या हातावर सुद्धा मेंदी काढली जाते. गणपतीच्या तळहातावर ॐ, किंवा मध्ये गोल आणि कडेला चार ठिपके काढले जातात. ‘तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला’ ही खूण असते नवविवाहित स्त्रीची खूण. तरुणपणातले मन असेच हळवे असते जे ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं’ असं वाटत असतं कारण या मेंदीच्या साक्षीनेच नवीन आयुष्यात तिने पदार्पण केलेले असते. मेंदी म्हणजे झाडापासून नाते तोडून आपला रस आणि आपल्या कणा-कणापासून ज्या हातावर सजते, तिथे सुख सौन्दर्य निर्माण करते आपला ठसा उमटवते. हे उदाहरण स्त्रीलाही लागू पडते. एका घरातून आपलं नातं तोडून आलेली सासरच्या घरच्या लोकांसाठी समर्पण करणारी स्त्री, लग्न करून सासरी गेलेली आपले जन्म मूळ सोडून दुसऱ्याच्या घरात आनंद निर्माण करणारी मेंदी ही स्त्रीचे रूप आहे. सुहाग आणि सौभाग्याची निशाणी मानली जाते. ‘टूटके डालीसे, किसी के हातपर, बिखर जाती है ये, ये तो मेंदी है, हर हाल मे रंग लाती है’ आनंदाचे, सौन्दर्य, समृद्धीचे प्रतीक असणारी मेंदी समर्पण आणि स्नेह यांची शिकवण देते.
प्रतिभा कारंजकर, फोंडा.