स्वाभिमानी आई

Story: छान छान गोष्ट |
25th August, 02:42 am
स्वाभिमानी आई

मायापूरच्या राजाराणीला नवसाने एक कन्यारत्न प्राप्त झालं होतं. कन्येचं नाव त्यांनी चांदणी ठेवलं होतं. चमचमणाऱ्या या चांदणीचे सारे हट्ट राजाराणी दोघे मिळून पुरे करत. चांदणी तशी गुणी मुलगी होती. उगा नको ते हट्टही ती करत नसे. कधी पुरणपोळ्या हव्या, तर कधी रेशमाचा झगा हवा असे तिचे बालहट्ट. 

राजगृृहात पारु नावाच्या एका महिलेस राणीच्या सेवेकरता नुकतंच नियुक्त केलं होतं. राणीची वेशभूषा, तिची केशभूषा हे सारं पारुबाई मन लावून करायची. या पारुची दोन्ही मुलं बरेचदा तिच्यासोबत राजवाड्यात यायची. घना व आनंदी या तिच्या दोन्ही मुलांची नि राजाराणीच्या चांदणीची छान मैत्री झाली होती. ती तिघं मिळून बागेतील हिरवळीवर खेळत असत. घना तर फार धीट होता. तो या मुलींना बागेतील खेकडे पकडून दाखवायचा, तर कधी बागेतील पेरुच्या झाडावर चढून या मुलींसाठी पेरू काढायचा. 

एके दिवशी पारुबाई राणीसाहेबांना म्हणाल्या, “राणीसाहेब, उद्या मला रजा हवी. उद्या रक्षाबंधन,  मला माझ्या मुलांसाठी गोडाधोडाचं बनवायचं आहे, त्यांच्यासोबत सण साजरा करायचा आहे.” राणीने पारुची रजा मान्य केली. मुलांसाठी कपडे घ्यायला म्हणून तिला काही पैसेही दिले. 

चांदणी हे सारं पहात होती. ती मुसमुसू लागली. राणीला कळेना, आपल्या छकुलीचं अचानक काय बिनसलं! राजाही राजदरबारातनं उठून आले. चांदणी स्फुंदत म्हणाली, “आईबाबा, मी कुणाला राखी बांधणार? मला कुणी भाऊच नाही.” आनंदी व घनाला चांदणीला असं रडताना पाहून फार वाईट वाटलं. न रहावून भीतभीतच आनंदीने महाराजांना विचारलं, “महाराज, आम्ही उद्या चांदणीला आमच्या घरी घेऊन जाऊ का़? ती माझ्यासोबत घनादादाला राखी बांधेल.” राजाने होकार दिला. चांदणी घना नि आनंदीसोबत त्यांच्या घरी गेली.

छोटसंच घर, पण कसं नीटनेटकं ठेवलं होतं! पारुने चांदणीला डब्यातला लाडूचिवडा खायला दिला. तिन्ही मुलं मिळून परसबागेत खेळत बागडत होती. घनाने चांदणीला पाटातनं वाहणारं पाणी दाखवलं. आनंदीचं बघून चांदणीनेही विहिरीतलं पाणी शेंदलं. तळ्यातले मासे बघितले. आकाशातलं सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहिलं, वाऱ्यावर डोलणारं हिरवंगार शेत पाहून तर तिला कोण आनंद झाला! आनंदी व चांदणीने घनासाठी लोकरीच्या दोन राख्या बनवल्या.पारुने जमीन सारवली, तीवर पाट ठेवला. आनंदीने पाटाभोवती रांगोळी काढली. घना नवा सदरा व लेंगा, डोक्यावर टोपी लेवून ऐटीत पाटावर बसला. पारुच्या सांगण्यानुसार आनंदी व चांदणीने घनाला कुंकू लावलं, त्याचं औक्षण केलं, राखी बांधली व त्याला नारळवडी भरवली. पारुच्या हातच्या नारळीभातावर मग तिघांनी मिळून ताव मारला. 

दर रक्षाबंधनला घनादादाला राखी बांधायला पारुमावशीकडे यायचं असा निश्चय चांदणीने केला. घनाने त्या दोघींना स्वतः काढलेली निसर्गचित्रं भेट म्हणून दिली. चांदणी जेव्हा राजवाड्यात गेली, तेव्हा तिने आपल्या आईवडिलांना पारुमावशीचं घर, तिच्या हातचा रुचकर नारळीभात, खोबऱ्याची वडी, हिरवीगार शेती, इंद्रधनुष्य, रंगीबेरंगी पक्षी त्यांचा किलबिलाट, कितीक गंमतगोष्टी सांगितल्या. घनादादाने भेट म्हणून दिलेलं त्यांच्या शेताचं, शेतातल्या विहिरीचं, कमळाच्या तळ्याचं सुंदर चित्र तिने आपल्या शयनगृहाच्या भिंतीवर लावून घेतलं. दुसऱ्या दिवशी पारु आली तेव्हा महाराजांनी तिला बोलावून घेतलं. त्यांच्यासोबत राणीही बैसली होती. पारुने त्या उभयतांना वाकून नमस्कार केला. महाराज म्हणाले, “पारु, तुला ठाऊकच आहे. आमची चांदणी आमच्या काळजाचा तुकडा आहे. आम्ही तिला जडजवाहीर सारं काही देऊ शकतो पण भाऊ... राणीला झालेल्या एका मोठ्या अपघातानंतर ती पुन्हा कधी आई बनू शकत नाही, हे तुला ठाऊक आहे. पारुला भावंडांची माया हवी होती आणि ती विकत घेता येत नाही. तू आलीस आणि तुझ्या मुलांच्या रुपात चांदणीला भाऊबहीण लाभले. राखी बांधण्यासाठी घनासारखा प्रेमळ भाऊराया भेटला. तुझ्या उपकारांची आम्ही परतफेड तर करूच शकत नाही, तरी ही द्रव्यांची थाळी भेट म्हणून स्वीकार.”

पारूने राजाराणीस लवून नमस्कार केला व म्हणाली, “ मला माफ करा महाराज, पण मी आपली ही भेट स्वीकारू शकत नाही. ती मी स्वीकारली, तर तो व्यवहार ठरेल. मला माझ्या मुलांसमोर चांगले आदर्श निर्माण करायचे आहेत. ही भेट स्विकारणं म्हणजे, आम्ही चांदणीसोबत घालवलेल्या आनंदी क्षणांचा सौदा केल्यासारखं होईल. मला ते नको आहे.” घना व आनंदी दोघं पारुच्या सोबत होते. आपल्या स्वाभिमानी आईचा त्या दोघांनाही केवढातरी अभिमान वाटला. तिच्या स्वाभिमानी स्वभावाचं राजाराणी दोघांनीही कौतुक केलं.


गीता गजानन गरुड