भरपाईसाठी आतापर्यंत २६५३ जणांचे अर्ज दाखल
पणजी : मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे राज्यातील ७४१ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. खात्याकडे नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत २,६५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. जसजसे अर्ज येत राहतील तसतसे शेतीच्या नुकसानीचे प्रमाण वाढेल, असे सुत्रांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. काही शेती वाहून गेली आहेत तर काही पुराच्या पाण्याखाली होती. विभागीय कृषी अधिकाऱ्यांमार्फत नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. अर्ज आल्यानंतर कृषी अधिकारी त्या भागाला भेट देऊन पाहणी करतात, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी शेती क्षेत्राची पाहणी केली. पुरामुळे रोपे कुठे लावली हे सांगणेही अशक्य झाले होते. त्यामुळे नुकसानीचे मूल्यांकन करण्यास विलंब झाला. ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
कृषी कार्ड नसलेले ४४७ अर्ज
४४७ अर्ज कृषी कार्ड नसलेले आहेत. कृषी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे क्षेत्र ६४८ हेक्टर आहे. कृषी ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे क्षेत्र ९२ हेक्टर आहे.
एकूण ७४१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. सासष्टी जिल्ह्यातील सखल भाग जलमय झाला होता. यामुळे मूल्यांकन करणे अशक्य होते, असे सूत्रांनी सांगितले.
पावसामुळे सर्वच भागात शेतीचे नुकसान झाले आहे. फळबागांच्या नुकसानीचे प्रमाण शेतीच्या तुलनेत कमी आहे. फोंडा आणि सत्तरी तालुक्यांत फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.