‘जीईसी’ने तयार केले ‘स्मार्ट’ हेल्मेट, घड्याळ
फोंडा : विजेच्या धक्क्यापासून वाचण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट’ हेल्मेट व घड्याळ दिले जाणार आहे. त्यामुळे जिवंत वाहिनीबाबत अलर्ट मिळणार असून ‘बीप’ अशा आवाजासह लाल इंडिकेटर पेटणार आहे. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने हे तंत्रज्ञान विकसित केल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
फोंडा येथे वीज खात्याच्या कर्मचारी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ढवळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, प्रसन्ना उटगी, अॅड सुहास नाईक, कार्यकारी अभियंता सुदन कुंकळयेकर, केतन भाटीकर व इतर उपस्थित होते.
वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या दृष्टीने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून स्मार्ट हेल्मेट व घड्याळ विकसित करण्यात आले आहे. जिवंत वीज वाहिनीपासून ५० ते ६० सेंमी अंतरावर अलर्ट मिळणार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना शॉक लागून होणार अपघात टाळता येतील, असे ढवळीकर म्हणाले.
यावेळी जॉन रॉड्रिग्ज, महादेव रेडकर, तुळशीदास नाईक, अफेक्स मोंतेरो, नाना पालकर, जोजेफ फर्नांडिस यांचा सत्कार करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी निधन झालेल्या विनय वर्णेकर यांचा मरणोत्तर सत्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला.