सर्वच खात्यांना अचानक भेट देणार असल्याचेही केले स्पष्ट
पणजी : प्रशासन योग्य पद्धतीने चालण्यासाठी सर्वच सरकारी खात्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामांना न्याय देणे महत्त्वाचे आहे. काही अधिकारी, कर्मचारी चांगले काम करतात. पण, काही जण सुस्तावलेले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शुक्रवारी अचानक कौशल्य विकास खात्याच्या पणजीतील मुख्य कार्यालयास भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या अचानक झालेल्या ‘एंट्री’मुळे अधिकारी, कर्मचारी वर्ग धास्तावला. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी खात्याचा कारभार, योजनांची अंमलबजावणी याचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यापुढे आपल्याकडे असलेल्या खात्यांसह इतर सर्वच खात्यांना आपण अचानक भेटी देणार आहे. कौशल्य विकास खात्यामार्फत तालुक्यांमध्ये चालणाऱ्या सरकारी आरटीआयनाही अशाच भेटी दिल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यासाठी त्यांच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. राज्यातील अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी आपापल्या कामांना योग्य पद्धतीने न्याय देऊन खात्याच्या योजनांचा जनतेला फायदा मिळवून देत आहेत. परंतु, काही अधिकारी सुस्तावलेले आहेत. त्यांनी आपली कामे चोखपणे पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.