म्हापसा : बागा समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचा वाहून आलेला मृतदेह आढळला. किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
ही घटना शनिवारी सकाळी घडली. किनाऱ्यावर तैनात जीवरक्षकांना पाण्यात मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी समुद्रात धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस तसेच पर्यटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉमध्ये पाठवून दिला.
अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेहाच्या डोक्यावर, चेहरा आणि शरीरावर काही जखमा आहेत. ही आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक परेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली अाहे. शवचिकित्सेनंतर त्याच्या मृत्यूमागचे कारण उघडकीस येणार आहे.