नानू - द सुपरहिरो

Story: छान छान गोष्ट |
11th August 2024, 05:07 am
नानू - द सुपरहिरो

दुपारचे दोन वाजून गेलेले. शाळेतली मुले अद्याप घरी पोहचली नव्हती. त्यामुळे कैलास नगरमधल्या रस्त्याच्या कडेला मुले येण्याची वाट पाहात आया ठिकठिकाणी उभ्या होत्या. कैलास नगरची बहुतांश मुले डिचोलीत शाळेला जात असत. कैलास नगर पासून डिचोलीचे अंतर जवळपास सहा किलोमीटर होते. त्यामुळे तिथल्या सर्व पालकांनी खास गाडीची व्यवस्था केली होती. मुलांना सकाळी शाळेत न्यायची आणि दुपारी घरी आणून सोडायची जबाबदारी त्या गाडीच्या चालकावर होती. तो अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने मुलांची ने-आण करायचा.

एखादेवेळी पालक घरी नसले तरी तो चालक त्या मुलाला घरापर्यंत सोडून येईल. मुलांचे आई बाबा काही कामानिमित्त बाहेर गेलेले असले तरीही मुले सुखरूप घरी पोचायची. नानू पण डिचोलीला शाळेला जायचा. तो यंदा सहावीत होता. आज नानूच्या घरी कोणी नव्हते. पप्पा रोजच्यासारखे कामावर गेले होते आणि ते सात नंतरच घरी येणार होते आणि मम्मी अचानक काही काम निघाल्याने आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. जाताना ती नानूच्या दुपारच्या जेवणाची सगळी तयारी करून गेली होती. शिवाय मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून खाऊचा डबा पण तयार ठेवला होता. त्यामुळे दिवसभराची नानूच्या पोटापाण्याची सोय झाली होती. शिवाय शेजारच्या रसिका काकूला नानूकडे लक्ष ठेवायला सांगून गेली होती.

शाळेतून मुलांना घेऊन गाडी आली. एक एक करत मुले उतरून आपापल्या आईसोबत घरात रिघली.  नानूला न्यायला त्याची आई नव्हती त्यामुळे गाडीचा ड्रायव्हर त्याला गेटच्या आत सोडून गेला. एवढ्यात शेजारची रसिका काकू चावी घेऊन आली. तिने कुलूप काढले. दोघेही आत गेली. “मी तुझं ताट करते तोपर्यंत तू हातपाय धुवून घे” असं म्हणून ती स्वयंपाक घरात गेली. नानूने शाळेचे कपडे काढले. ते नीट हँगरला लावले आणि हातपाय धुवून तो जेवणाच्या टेबलवर आला. एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. नानूची मम्मी फोनवर होती. तिने त्याची चौकशी केली आणि फोन ठेवला. तेवढ्यात नानूच्या समोर जेवणाचं ताट ठेवून रसिका आपल्या घरी गेला.

आत घरात नानू एकटाच होता. अशाप्रकारे घरात एकटाच असण्याची त्याची पहिलीच वेळ होती. शेजारच्या रसिका काकू होत्याच तरीही मनात अनामिक अशी भीती होतीच. जेवण झालं. नानूने आपलं ताट विसळलं. ते नीट जागी ठेवलं आणि विरंगुळा म्हणून त्याने टिव्ही लावला.  छोटा भीम चालू होतं. तो बघत बसला. टिव्ही बघत असतानाच आपलं दप्तर घेऊन तो शाळेतून दिलेला गृहपाठ करत बसला.

दारावर टकटक झाली. मम्मी आली असेल असा समज होऊन त्याने दार उघडलं. तर अचानक दोघे अनोळखी तडक घरात शिरले. काही बोलायच्या विचारायच्या आधीच त्यांच्यातील एकाने आतून दार लावून घेतले तर एकाने नानूचे तोंड दाबून धरले. हा सारा प्रकार पाहून नानूच्या लक्षात आले की आपल्या घरात चोर शिरले आहेत. नानूचे हातपाय गळाले. तो भीतीने गार झाला. हे चोर आपण एकटे आहोत हे पाहून घरात शिरलेत ते आपला हेतू साध्य करूनच जातील हे त्याने जाणले. आता आपली सुटका नाही. प्रसंगी आपला जीवही जाऊ शकतो. नानूच्या डोक्यात भयंकर भयंकर विषय घोळू लागले.

नानू आपल्या विचारांच्या तंद्रीत असताना त्या दोघांपैकी एक जण घरातले जे जे काही पळवू शकतो ते त्याने गोळा केले. एका मागून एक खोली, जागा तो पालथी घालत होता. आता त्याने आपला मोर्चा बेडरूमकडे वळवला. बेडरूमचे दार उघडेच हेते. चोराचे लक्ष बेडरूम मधल्या मोठ्या कपाटाकडे वळले. त्याची खात्री झाली की घरातले मौल्यवान दागिने, पैसे त्याच कपाटात असणार. त्याने कपाट उघडायचा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नात मोठा आवाज होवू लागला. असा आवाज होणे धोक्याचे होते हे त्याला समजले.  

नानू घाबरला होताच परंतु त्याही स्थितीत आपल्याला काही करता येते का हा विचारही त्याच्या मनात सुरू होता. तो आता संधीची वाट पाहात होतो. तेवढ्यात चोराने नानूकडे कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. नानूच्या डोक्यात एक विचार चमकला. त्याने दुसऱ्या खोलीकडे बोट दाखवले. “शहाणपणा न करता गपचूप जावून चावी आण म्हणून नानूला मोकळे सोडले. आपल्या दोघांसमोर एवढुसा पोरगा चलाखी करणार नाही असा त्यांचा समज होता. नानूला मोकळे सोडल्यावरही आपण जाम घाबरलो आहे असे भासवत तो निमूटपणे बेडरूमच्या बाहेर आला आणि एका झटक्यात त्याने बेडरूमचे दार बाहेरून बंद केले. कडी घातली. आणि “चोर चोर” असे जोरजोरात ओरडू लागला. त्याचा तो आवाज ऐकून दुसर्‍याच क्षणी शेजारी धावत पळत नानूच्या घरी आले. नानूने सगळा प्रसंग सांगितला, तसे एकाने पोलिसांना कळवले आणि सगळेजण घरातच बेडरूमच्या बाहेर दबा धरून बसले. बेडरूमच्या बाहेर पडायला एकच दरवाजा असल्याने चोर पळायची शक्यता शून्य होती. आत चोरही अचानक घडलेल्या प्रसंगाने बिथरून गेले. आणि घाबरून त्यांनी बेसरूमला आतून कडी लावली.

थोड्या वेळात पोलीस तिथे पोचले. आता आपण पकडले जाणार हे त्यांना कळून चुकले. त्यांना बेडरूमचे दार उघडून निमूटपणे बाहेर येण्याचे आवाहन केले. आपला आता काही शहाणपणा  चालणार नाही याची खात्री होऊन त्यांनी दार उघडले. तसे पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले.

एव्हाना संध्याकाळचे पाच वाजताच आलेले. नानूची मम्मी परत आली. आपल्या दारात पोलिसांची गाडी, लोकांची गर्दी पाहून तिच्या पायातला त्राणच गेला. भलते सलते विचार मनात आले. ती धावतच घरात गेली तर नानू रसिका  काकूच्या कुशीत बसलेला. पोलिसांच्या ताब्यात चोर होते.

तिला घडला सर्व प्रकार रसिका आणि पोलीसांनी सांगितला. तिने थरथरत्या हाताने नानूला जवळ घेतले. त्याचे पटापटा मुके घेतले. सर्वांनी नानूच्या धाडसाचे कौतुक केले. पोलिसांनी नानूच्या नावाची विशेष शौर्य पदकासाठी शिफारस करणार असल्याचे सांगून “नानू- द सुपरहिरो” म्हणत नानूची पाठ थोपटली.


चंद्रशेखर शंकर गावस