१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे जन्म झालेले नरेंद्रनाथ दत्त पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले गेले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षीच १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडले होते. त्यानंतर जगाचे लक्ष त्यांनी वेधले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आज बारा जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यामुळे आज आपण पाहूयात स्वामी विवेकानंदांच्या काही छान छान गोष्टी.
मनाची एकाग्रता लहानपणापासूनच
स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच देवभक्त होते. एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची त्यांची मनाची एकाग्रता होती. नरेंद्र आणि त्यांचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसली होती. नरेंद्र तर पूर्णपणे ध्यानमग्न झाले होते. तेवढ्यात एका कडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्र यांच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले; म्हणून भुवनेश्वरीदेवी येऊन पाहातात तर काय? नरेंद्र तसाच शांतपणे डोळे मिटून बसला होता. साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता.
एकाग्रतेचे महत्त्व
एकदा अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर काही मंडळी एक खेळ खेळत होती. तो खेळ असा होता की, समोर येणाऱ्या लाटेवरील हिंदकळणाऱ्या चेंडूवर नेम धरून मारणे. चेंडू सततच हालत असल्यामुळे तेथील कुणालाच ते व्यवस्थित जमत नव्हते. एक भारतीय युवक तेथून चालला होता. त्याने त्या हिंदकळणाऱ्या चेंडूवर आपला नेम अचूक मारून दाखवला. तो युवक अर्थात नरेंद्र दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद होता. अमेरिकन मंडळींनी ते पाहून आश्चर्य व्यक्त केले. ‘हे त्यांना कसे जमले?’, या अमेरिकन मुलांच्या प्रश्नाला उत्तर देताना विवेकानंद यांनी त्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले. केवळ एकाग्रतेनेच हे साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.
मनःशांती
अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ येऊन म्हणाला, “स्वामीजी, तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.” त्यावर स्वामीजी म्हणाले, “सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणाऱ्या दु:खी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.” यावर त्या तरुणाने त्यांना, “एखाद्या रोग्याची सेवा करताना मीच आजारी पडलो तर?” असा प्रश्न विचारला.
विवेकानंद म्हणाले, “तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मन:शांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.”
स्नेहा सुतार