चांगुलपणाचं फळ

Story: छान छान गोष्ट |
05th January, 03:24 am
चांगुलपणाचं फळ

जित्याची बहीण जित्याच्या पाठी लागलेली, “चल नं रे दाद्या फटाके घिऊया. समद्यांनी घितले. आपुन कवा घेनार?” जित्याची आई, बायजा स्टोला पीन लावीत होती. थोडंसं पीठ शिल्लक होतं. त्याची पोरांना भाकर करुन देणार होती. दोघांत अर्धी अर्धी वाटणार होती, जोडीला बुक्कीने फोडलेला कांदा. पोरही शहाणी होती. मीठाच्या खड्यासोबतपण भाकर खायची.

सातव्या इयत्तेत शिकणारा जित्या आपल्या मायची परिस्थिती ओळखून होता. जित्याचा बाबा लय भला माणूस पण हल्ली त्याच्या पोटात दुखू लागलेलं, त्या कारणाने घरीच असायचा. जित्याची माय समोरच्या बिल्डींगीतल्या चार घरची धुणंभांडी करायची. तिचा कामातला नीटसपणा बघून अलिकडे तिला पोळीभाजीची कामंही मिळालेली. घरादाराचं दैन्य सुटू पहात होतं, चांगले दिवस येऊ घातले होते पण अचानक जित्याचे बाबा आजारी पडले. आधी वाटलं, होतील बरे दोनचार दिवसांत. घरगुती उपाय करून झाले, वेशीपलिकडच्या वैद्याकडे जाऊन आली. लोकं दहा दिशांचे उपाय सुचवत होती. बाबा रात्री पोटावर हात धरून तळमळत असायचे. डोळ्यातनं पाणी काढायचे पण मुलं, बायको घाबरतील म्हणून तोंडातनं आवाज करीत नव्हते. बायजाला मात्र त्यांचं दुखणं कळत होतं. बाबांच्या औषधांवरच बायजाचा अर्ध्याहून अधिक पगार जात होता. आत्ता तर डॉक्टरांनीसुद्दा सांगितलेलं, मोठ्या शहरात घेऊन जावा नाहीतर आशा सोडा. शहरात जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.

बायजाने पटापटा दोन भाकऱ्या भाजल्या. जित्या व पिट्टीला एकेक दिली व त्यांच्या बाबांसाठी पेज ठेवली. आज तीसुद्धा पेज खाऊन निजणार होती. उद्या सावंत आजीने पैसे दिल्यावर दळण आणणार होती. तशी बिल्डींगीतली माणसं चांगली, पण लक्ष्मीला कुणापुढे हात पसरायला आवडतं नव्हतं. ती स्वाभिमानी स्त्री होती.

जित्या भल्या पहाटे रानातल्या तळ्याकडे जायचा. जाईपर्यंत उजाडू लागायचं. तिथे लाल, पांढरी कमळं फुललेली असायची. जित्या तळ्यातल्या चिखलात उतरुन कमळं काढायचा नी देवळासमोर विकायला बसायला. तेवढेच चार पैसे सुटायचे. मग घरी येऊन शाळेची वाट धरायचा. त्यादिवशी तो असाच पहाटे उठून रानाच्या दिशेने जात होता. तळ्याजवळ जातो तर एक आकृती त्याला रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहतो तर डॉ. गाढवेंचा मुलगा डॉ. चेतन. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेला चेतन कुठल्यातरी गाडीचा धक्का लागून रस्त्याच्या कडेला पडलेला. जित्याने लगेच धावत जाऊन त्याला उचलला. डॉ. चेतन शुद्धीत नव्हता. जित्याने तळ्याकडे जाऊन ओंजळीतून पाणी आणलं. ते पुरेना म्हणून बाजूच्या केळीच्या बनातलं केळीचं पान तोडून त्याचा द्रोण बनवून त्यातून पाणी आणलं आणि चेतनला प्यायला दिलं. चेतन हळूहळू सावरला. त्याने जित्याचे आभार मानले.  

तेवढ्यात घटनास्थळी पोलीस व डॉ. चेतनचे वडील पोहोचले. डॉ. गाढवे व त्यांचे कुटुंबीय जित्याच्या घरी गेले. जितू व पिट्टीच्या शिक्षणाची जबाबदारी, जित्याच्या वडलांच्या उपचारावरील खर्चाची जबाबदारी डॉ. गाढवे यांनी स्वीकारली. काही रोख रक्कम पोलीस काकांनी व  डॉक्टरांनी जितूच्या आईकडे सुपूर्त केली व जितूचे कौतुक केले.

जितूच्या प्रसंगावधानाने डॉ. चेतनचे प्राण वाचले. जितूला त्याच्या चांगल्या कामाचे चांगले फळ मिळाले. पिट्टी प्रथमच दिवाळी दिवशी फराळ करत होती, फटाके वाजवत होती. मुलांचे बाबा आता बरे होणार, घराला पुन्हा चांगले दिवस येणार या विचारांनी बायजाच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी आनंद पसरला होता. 


गीता गरुड