डिसेंबर महिन्याची एकतीस तारीख जवळ येताच अगदी “आपण पार्टी करूया, पार्टी करूया” म्हणून नाचणारा चिनू डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी गप्प गप्पच होता. कुठल्यातरी विचारात व्यस्त आहे हे चिनूच्या आईच्या नजरेतून काही सुटले नाही. तिने योग्य वेळ पाहून आणि चिनूचा मूड पाहून त्याला मायेने विचारले, “बाळा चिनू, या दिवसांत तू असा गप्प गप्प का रे? नि ईयरची पार्टी नाही करायची आपण? नववर्षाचे स्वागत नाही करायचे आपण?” आईने मायेने विचारल्यावर चिनू एवढेसे तोंड करीत म्हणाला, “आई मला सांग, नवीन वर्षी आपण आपल्या आजीला पण वृद्धाश्रमामध्ये ठेवणार आहोत का ग? नवीन वर्षात मला आजीची साथ नाही मिळणार?”
आई स्मितहास्य करीत म्हणाली, “अरे चिनू बाळा, तू असा विचार का करतोस? आपण सगळे तुझ्या आजीवर खूप माया करतो. तुझी आजी पण आमच्यावर खूप माया करते आणि आपण आपल्या आजीला असे का करणार?” त्यावर चिनू पटदिशी बोलला, “आई मागच्याच आठवड्यात मनुच्या आज्जीला त्याच्या बाबांनी वृद्धाश्रमात नेऊन ठेवले आहे. हे तुला सुध्दा माहिती आहे. अगं मनू मला सांगत होता, तुझे बाबा सुद्धा तुझ्या आज्जीला आणखी काही दिवसांनी वृद्धाश्रमात ठेवतील. मग तुला कोण गोष्टी सांगणार? तुला कुशीत कोण घेणार? आई खरंच बाबा आपल्या आज्जीला वृध्दाश्रमात ठेवणार?” आणि चिनू गप्प झाला. आईने चिनूला मायेने समजावले, तशी चिनूची नाराजी थोडी दुर झाली आणि तो नाताळाची सुट्टी असल्याने मनूसोबत खेळायला पळाला.
चिनूच्या आईला चिनू का गप्पगप्प होता त्याचे कारण आता समजले होते. मनूच्या आज्जीला तिच्या घरच्यांनी वृध्दश्रमांत ठेवले याचे तिलाही वाईट वाटत होते कारण चिनू आणि मनूची आज्जी शेजारी राहणाऱ्या घट्ट मैत्रीणी रोज गॅलरीतून गप्पा मारायच्या. पण मनूची आज्जी वृध्दाश्रमात गेल्यापासुन तीही दु:खी होती. त्यामुळे चिनूच्या आईने चिनूच्या मनातली ही गोष्ट त्याच्या बाबांच्या कानावर घातली. दोघांनी मिळून ठरवले की नवी वर्षाच्या पार्टीला आजीलाही न्यायचे. आजीला आता चालताना थोडा त्रास व्हायचा पण घरात ती सगळी आपली कामे व्यवस्थित करायची त्यामुळे चिनू-मनूचे आई बाबा तिच्या आज्जीला नववर्षानिमित्त होणाऱ्या ३१ डिसेंबरच्या पार्टीला घेऊन गेले. आजी खूप खुश झाली. आजीने केरीओकेच्या संगीतावर पार्टीत एक भक्तीगीतही गायले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले. आजी, चिनू खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी चिनूच्या बाबांना एक कल्पना सुचली.
नववर्ष सुरू झाले. चिनू आपल्या खेळात, अभ्यासात व्यस्त झाला. चिनूच्या बाबांनी एक प्लान आखला. डिसेंबरच्या दोन तारखेला चिनूच्या आईबाबांनी खास ऑफिसला सुट्टी घेतली ते एका खास करण्यासाठी. ते म्हणजे ती चिनूला आणि मनूला घेऊन त्या वृद्धाश्रमात गेले जिथे मनूच्या बाबांनी मनुच्या आज्जीला काही दिवसांपूर्वी नेऊन ठेवले होते. अर्थात बाबांनी तेथील व्यवस्थापक, अधिकारी सगळ्यांची रीतसर परवानगी घेतली होती. चिनूच्या आईने मनुच्या आजीच्या आवडीचा गोडाचा शिरा बनवला आणि खास बांगड्याचे लोणचे. ते पण जास्तीचे. सगळ्यांसाठी तिथल्या सगळ्या वृद्धांसाठी म्हणून... आणि चिनूने खास मनुच्या आज्जीच्या आवडीची कॅडबरी चॉकलेट पण विकत घेतली.
चिनू, मनू, आई-बाबा सगळे वृद्धाश्रमास पोहोचले. अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन मनुच्या आजीजवळ गेले. आज्जीने चिनू, मनूला घट्ट मिठीच मारली. नंतर काही वेळ सगळ्यांनी आजींशी छान गप्पा मारल्या आणि घरी परतताना चिनू-मनूने आज्जीला नमस्कार केला. एक-दोन महिन्याच्या आतच परत आम्ही तुला भेटायला येईल असेही सांगितले. गाडीतून येताना चिनूच्या बाबांनी चिनूला समजावले, की ते चिनूच्या आज्जीला कधीच कुठल्याही वृद्धाश्रमात ठेवणार नाही. घरी जाताना चिनूने आपल्या आजीसाठी पण एक छान कॅडबरी चॉकलेट घेतले.
घरी आल्यावर चिनूने आनंदाने उड्या मारतच आजीला चॉकलेटचा तुकडा भरवला आणि खेळायला पळाला. आजी आपल्याला सोडून वृद्धाश्रमात जाणार नाही, ती रोज आपल्याला छान छान गोष्टी सांगणार, आपण आजीच्या कुशीत झोपणार म्हणून नववर्षाला चिनू खूप आनंदात होता आणि चिनुला आनंदात पाहून त्याचे आई-बाबा आणि आजी सुद्धा खूप आनंदात होती.
- शर्मिला प्रभू ,
आगाडी, फातोर्डा