गारेगार आयस्क्रीम!!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
15th December, 04:34 am
गारेगार आयस्क्रीम!!!

सर्वांचं फेव्हरेट... गार गार यम्मी यम्मी आयस्क्रीम. तुमच्यासारख्या लहानांपासून ते अगदी आजी - आजोबांना देखील आईस्क्रीम फार आवडतं. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बाजारात उपलब्ध आहेत. आईस गोला, फॅमिली पॅक, कोन, फ्रूट आईस्क्रीम, आईस कँडी, कुल्फी इ. पण तुम्हाला माहीत आहे का??? आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी पारंपरिक कुल्फी हा सगळ्यात चांगला प्रकार. दूध आटवून त्यात सुकामेवा, वेलची, साखर इत्यादी पदार्थ घालून कुल्फी बनवली जाते. बाजारात मिळणाऱ्या काही आईस्क्रीम्समध्ये कृत्रिम फ्लेवर्स, कृत्रिम रंग, प्रिझर्वेटीव वापरले जातात जे आरोग्यासाठी चांगले नसतात.

पूर्वी आईस्क्रीम दुधापासून बनवले जात असे परंतु आत्ता आईस्क्रीम कंपन्या आईस्क्रीम बनवण्यासाठी वनस्पती तूप, तेल इत्यादी पदार्थ वापरतात आणि हे पदार्थ वापरून तयार केलेल्या पदार्थाच्या पॅकेजिंगवर फ्रोझन डेझर्ट असे नाव छापलेले असते. असे फ्रोझन डेझर्ट जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील चरबी ज्याला कोलेस्टेरॉल असे म्हणतात ती वाढू शकते. आणि त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्यसुद्धा बिघडू शकते. आईस्क्रीम रोज आणि अति प्रमाणात खाल्लं तर आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात आईस्क्रीम खाल्लं तर सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता जास्त असते.

पण तुम्ही अजिबात घाबरू नका. मला माहीत आहे की तुम्हाला आईस्क्रीम खूप आवडतं म्हणूनच मी तुम्हाला कोणताही त्रास न होता आईस्क्रीम एन्जॉय कसं करायचं ते सांगते. तुम्ही जर शहाण्या मुलांसारखं खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या तर आरोग्याला कसलाही त्रास न होता आईस्क्रीम मनसोक्त एन्जॉय करू शकाल. 

आपण जे खाणार आहोत ते आईस्क्रीम आहे आणि फ्रोझन डेझर्ट नाही याची खात्री करा. 

माहीत नसलेल्या कंपनीचे आईस्क्रीम खाणे टाळा.

खूप दिवसांचे किंवा ज्याच्यावर मॅन्यूफॅक्चरींग व एक्सपायरी तारीख नाही असे आईस्क्रीम खाणे टाळा.

दुधापासून बनवलेले आईस्क्रीम असेल तर फ्रूट फ्लेवर्स टाळावे, विशेषत: आंबट फळांच्या फ्लेवर्स उदा. स्ट्रॉबेरी, संत्रे, ब्ल्यू बेरी, पायनॅपल इ. पण मँगो आईस्क्रीम मात्र खाल्ले तर चालते.

दररोज आईस्क्रीम खाऊ नये कारण त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे जास्त साखर खाण्याचे जे दुष्परिणाम होतात ते सगळे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतील. 

आईस्क्रीम हे पचायला जड असते त्यामुळे जेवणानंतर शक्यतो आईस्क्रीम खाऊ नये. जेवण आणि आईस्क्रीम खाणे यामध्ये किमान दोन ते तीन तासांचे अंतर असावे. 

सकाळी १० वाजल्यानंतर व संध्याकाळी  ४- ४:३० पर्यंतची वेळ आईस्क्रीम खाण्यासाठी योग्य आहे. 

वारंवार सूर्यास्तानंतर व रात्री उशिरा आईस्क्रीम खाणे टाळावे. 

आईस्क्रीम एकाचवेळी अतिप्रमाणात खाणे टाळा. 

तुम्हाला जर भरपूर आईस्क्रीम खायची सवय असेल, तर लठ्ठपणा वाढू शकतो. आईस्क्रीममध्ये शुगर आणि कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे शरीरातील चरबी वाढू शकते. श्वसन संस्थेचे सर्दी, खोकला, दमा इ. आजार तर जास्त आईस्क्रीम खाल्ल्याने होतातच. 

आईस्क्रीम खाण्याचा आनंद सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन व अवेळी सेवन हे त्रासदायक ठरू शकतं. म्हणून आईस्क्रीम खाताना वरील युक्ती वापरा आणि आईस्क्रीमचा आनंद उन्हाळ्यात घ्या आणि हा तुम्हाला कडू कडू सर्दीची औषधं घ्यायची नसतील तर वातावरण थंड असताना आईस्क्रीम खाण्याचा हट्ट टाळा.


-वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य