इतिहासात ‘अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा’, असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर. या किल्ल्याला वज्रगड म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावरच झाला होता. या किल्ल्यावर काही दिवस पेशव्यांची राजधानीही होती. संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या किल्ल्याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर पुरंदरचा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने मोठा आणि मजबूत असून अत्यंत सुरक्षित असा मानला जात होता. गडावर मोठ्या प्रमाणावर शिदोरी राहू शकत होती. तसेच दारूगोळा आणि धान्याचा साठा करून दीर्घकाळ किल्ला लढवता येऊ शकत होता, त्यामुळे या किल्ल्याला खास महत्त्व होते. या किल्ल्याच्या तीन बाजूंना दुर्गम परिसर होता.
किल्ला साधारणपणे १२०० वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. १४८९ च्या सुमारास निजामशाहीतील मलिक अहमदने किल्ला जिंकला. १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास पाठवले तेव्हा याच किल्ल्यातून शिवरायांनी त्याला लढा दिला. पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने फत्तेखानाला पराभूत केले.
१६५५ मध्ये शिवरायांनी नेताजी पालकरला सरनौबत नेमले. १६ मे १६५७ ला संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. पण मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. त्यानंतर झालेल्या युद्धात मुरारबाजी पडला. त्यामुळे राजांना तह करावा लागला. हाच तो प्रसिद्ध पुरंदरचा तह. या तहात राजांना २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले.