बेबी आतू सुट्टीत जेव्हा जेव्हा गावी जाते, तेव्हा तेव्हा ती आपल्या छोट्या सोनूसाठी काही तरी भेट घेऊन जातेच जाते. बेबी आतू येणार हे सोनूला माहित असते. ती वाटेवर डोळे लावून ओसरीवर बसलेलीच असते. “माझी बेबी आतू येणार, माझी बेबी आतू येणार...” असा घरभर किलबिलाट चालूच असतो तिचा. गणपतीला बेबी आतू आलेली तेव्हा सोनूने तिला पुढच्या वेळी येताना गोष्टीचं पुस्तक आणायला सांगितलं होतं. बेबी आतूने बरोबर ते लक्षात ठेऊन सोनूसाठी पुस्तक आणून घेतलं होतं.
आज बेबी आतू येणार म्हणून सोनू सकाळी लवकर उठून तयार झाली. तिला आईने नाश्ता करायला बोलावलं तर नको म्हणाली. “मी बेबी आतू बरोबर नाश्ता करणार. तिला मी सांगितलंय फोनवर लवकर ये म्हणून.” दुपार होत आली तरी बेबी आतू काही येत नाही म्हणून सोनूच्या आईने तिला चपाती भाजी भरवायचा प्रयत्न केला. पण सोनू काही जेवायला तयार नाही. आपली बाहुली घेऊन ती दारावर बसून राहिली. बसल्या बसल्या तिला झोप येऊ लागली.
डुलकी घेणार इतक्यातच बेबी आतूच्या गाडीचा आवाज कानी पडला. “सोनूऽऽऽ” म्हणत बेबी आत्या गाडीतून उतरून धावत आली. “बेबी आत्याऽऽऽ” म्हणत सोनूही जागी झाली. दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. बेबी आतूनं हातातलं पुस्तक सोनूला दिलं. “हे बघ, तू पुस्तक आण म्हणाली होतीस ना? बघ चित्रांचं पुस्तक आणलंय मी.” “आतू गोष्ट सांग ना आता...” म्हणत सोनू तिच्या पुढ्यातच बसली. “आत्ता नाही हा सोनू. आता हातपाय धूते, मग जेवूया आणि नंतर बसूया. मग मी तुला सांगते हा गोष्ट.” आतू बरोबर बसून सोनू भरपूर जेवली. समोर पुस्तक होते. सोनू एकदा पुस्तकाला बघत होती, एकदा आतूला बघत होती. सगळ्यांची जेवणे आटोपली. सोनूचे आईबाबा आणि बेबी आत्याचे आईबाबा बोलत बसले.
सोनू आणि बेबी दोघीही माडाच्या सावलीत पुस्तक घेऊन बसल्या. सोनूने पुस्तक उघडले. त्यात पहिल्याच पानावर टोपी घातलेला माकड होता. “हा टोपी घालून काय करतो आतू?” आता बेबी आतू शिकते बालवर्गात. सोनू तर शाळेलाच जात नाही अजून. आता सोनूला गोष्ट तर सांगितलीच पाहिजे. म्हणून बेबी आतू म्हणाली, “हा पणजीचा माकड. तिथे जंगल नाही ना, मग त्याला टोपी घालावी लागते. ऊन लागतं ना त्याला.” “हो का? तू त्याला इथे घेऊन ये आतू. आपण त्याला आपल्या जंगलात सोडूया.” बेबी आतूने सगळी चित्रे पाहून सोनूला गोष्ट तयार करून सांगितली. मग दोघीही खेळायला गेल्या. फणसाच्या झाडाच्या आडोशात लपाछपी खेळल्या. खूप गोष्टी केल्या.
रात्री झोपताना सोनूला तो टोपी घातलेला माकडच आठवत होता. आमच्या झाडांवर नाचणारे माकड किती आनंदात असतात. उड्या मारतात. पणजीत राहणाऱ्या माकडाला मात्र टोपी घालावी लागते. त्याला जंगल नाही म्हणून सोनूला वाईट वाटलं.
“सोनूऽऽ” बेबी आतूने सोनूला उठवलं. बेबी आतू पणजीला जायची तयारी करत होती. सोनू जागी झाली. म्हणाली, “थांब हं आतू, बाबा खाऊ घेऊन येणार. रात्री तसं बाबानं सांगून ठेवलंय मला.” बेबी आतू तयारी करत होती. आईने तिला गाडीत बसवलं. इतक्यात सोनू डबा घेऊन आली. “आतू हे घे.” “काय गं हे?” “जांभळं दिलीत बाबाने. आतू जांभळं खा हं, पण बिया कचऱ्यात टाकू नको. कुठे तरी फेकून दे. दूर फेक उघड्या जागेवर. मग पाऊस पडला की झाड उगवणार आणि माकडाला बसायला मिळणार. मग त्याला टोपी घालावी लागणार नाही.” सोनू आतूला आनंद झाला. आपण सोनूला पुस्तक भेट दीले पण सोनूने आपल्याला त्याहीपेक्षा मोठी भेट दिली म्हणून आतूने आनंदाने सोनूला मिठी मारली.
-वर्षा मालवणकर